Thane Student Suicide: बारावीला ९५.७ टक्के मिळवूनही इच्छित संस्थेत प्रवेश न मिळू शकलेल्या ठाण्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. १७ वर्षीय विद्यार्थ्याचा यामुळे मृत्यू झाला. द इंडियन एक्सप्रेसने पीटीआयच्या हवाल्याने वृत्तानुसार, ठाण्यातील घोडबंदर येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात सदर अल्पवयीन विद्यार्थ्याचे कुटुंबीय राहतात. बारावीत ९५ टक्के गुण मिळवल्यानंतर सदर विद्यार्थ्याला कोलकातामधील शिबपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी संस्थेत दुहेरी पदवी घ्यायची होती.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत ९५.७ टक्के मिळवले होते. त्याला कोलकातामधील शैक्षणिक संस्थेत दुहेरी पदवी घ्यायची होती. यासाठी त्याने सदर संस्थेची ॲप्टिट्यूट टेस्ट दिली. मात्र त्यात त्याला यश येऊ शकले नाही. तो पहिल्या १० हजारांतही नव्हता. या निकालामुळे विद्यार्थी नैराश्यात गेल्याची माहिती मिळत आहे.

कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवला मेसेज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याने सायंकाळी ७.३० वाजता घर सोडले. आपण सायकलवर फिरण्यासाठी जात असल्याचे त्याने घरच्यांना सांगितले होते. ४५ मिनिटांनंतर त्याने कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज पाठवून आयुष्य संपवणार असल्याचे सांगितले.

हा मेसेज वाचून कुटुंबीयांनी त्याला तत्काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन त्यानंतर स्विच ऑफ येत होता. यामुळे धास्तावलेल्या कुटुंबीयांनी कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस आणि कुटुंबीयांनी यानंतर मुलाचा संयुक्तपणे शोध घेतला. मात्र त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्याने एका इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी विद्यार्थ्याला तात्काळ ठाण्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेत कोणत्याही घातपाताची शक्यता नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असल्याचे पोलीस म्हणाले. विद्यार्थ्याला ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश हवा होता, तो न मिळाल्यामुळे तो तणावात होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.