ठाणे : ठाण्याच्या मानपाडा भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असतानाही, त्याठिकाणी महिनाभरात ५०० ब्रास माती, दगड आणि मुरूम उत्खनन करण्यास परवानगी देऊन नंतर ती दहा दिवसांत रद्द केल्याचे वृत्त लोकसत्ता ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे तहसीलदार उमेश पाटील आणि इत्तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे काँग्रेसने धरणे आंदोलन केले.

ठाणे शहराला लागूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असून या भागात खाणकामास परवानगी देण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला होता. मानपाडा भागात राहणारे सिद्धार्थ नारायण तांगडी यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी मानपाडा येथील सर्व्हे क्रमांक ५९/अ/१/१ वरील ७.३८ हेक्टर क्षेत्रावर ५०० ब्रास माती, दगड आणि मुरूम उत्खनन करण्यास परवानगी देण्याची मागणी ठाणे तहसीलदार कार्यालयाकडे केली होती. ही मागणी मान्य करत ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी २० डिसेंबर २०२५ रोजी अल्प, तात्पुरत्या मुदतीचा गौण खनिज उत्खनन परवाना दिला. त्यात २० जानेवारी २०२६ पर्यंत किंवा ५०० ब्रास माती, दगड, मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन यापैकी जे अगोदर होईल, तोपर्यंत परवाना वैध राहील असे नमूद करण्यात आले होते.

दहा दिवसांत परवानगी रद्द

मानपाडा येथील ही जमीन ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात आहे. येथे सर्व कामांची प्रतिबंधित, नियंत्रित आणि प्रोत्साहित अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार येथे खाणकाम करण्यास प्रतिबंध असतानाही ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी त्याला परवानगी दिल्याचे लक्षात येताच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे येऊर विभागाचे उपसंचालक प्रदीप पाटील आणि वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी तात्काळ त्याबाबत आक्षेप नोंदविला. यानंतर पाटील यांनी दहा दिवसांतच परवानगी रद्द केली होती.

काँग्रेसचे धरणे

पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात उत्खनन करण्यास परवानगी दिल्याचे वृत्त लोकसत्ता ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर ठाणे काँग्रेसने बुधवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर आणि बेकायदेशीर परवानगी देणाऱ्या तसेच उत्खननास मदत करणाऱ्या ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली.