Ayodhya Ram Temple Flag Hoisting Event : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, मंगळवारी ११. ५५ मिनिटांनी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यातील मंदिरांमध्ये तसेच काही घराघरात घंटानाद करण्यात आला. हा घंटानाद ११. ५५ ते १२. १० असा २० मिनिटे सुरु होता.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ.मोहन भागवत भगवा धर्मध्वज फडकवला. या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी देश-विदेशातील रामभक्तांना मंदिर पूर्णत्वाचा संदेश दिला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी ध्वज फडकताच देशभरातील अनेक मठ-मंदिरांमध्ये आणि सनातनी घरांमध्ये घंटानाद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार, ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यावतीने ठाण्यातील मंदिर, मठ व्यवस्थापकांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकताच घराघरात तसेच मंदिरांमध्ये घंटानाद करण्यात यावे. या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्यातील मंदिर, मठ तसेच काही घराघरांमध्ये घंटानाद होताना दिसून आले.

ठाण्यातील घंटाळी परिसरात असलेल्या प्राचीन आणि ऐतिहासिक घंटाळी मंदिरात घंटानाद करण्यात आला. यावेळी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, घंटाळी मंदिराचे व्यवस्थापक सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

असा आहे भगवा ध्वज…

या विशेष भगव्या ध्वजावर सूर्यवंशाची प्रतीक चिन्हे आहेत. श्रीराम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद असा हा भगवा-केशरी ध्वज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकविण्यात आला आहे. हा ध्वज सुमारे ४ किलोमीटर दूरूनही दिसणार आहे. त्यासाठी राम मंदिरात ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. भविष्यात ध्वज बदलण्यासाठीही हीच सिस्टम वापरली जाईल. वारा जोरात वाहिल्यास ध्वज ३६० डिग्री फिरू शकतो अशी व्यवस्था आहे.