महापालिकेतील रस्ते कामे, स्मार्ट सिटी योजनेतील विविध प्रकल्पांमधील अनियमितांच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असतानाच, त्यापाठोपाठ आता छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालयातील औषधालय भाडे तत्वावर देण्याची निविदेवरून पालिका प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात साप़डला आहे. नामांकित औषध विक्रेत्यांना फायदेशीर ठरण्याच्या उद्देशातून निविदा काढण्यात आल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर केल्याने खळबळ उडाली असून त्याचबरोबर ही निविदा प्रक्रीया संशयाच्या फेऱ्यात आल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात पालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरु आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्राप्त होताच केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाने या कामांची चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते कामांसाठी २१० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने दिला आहे. या निधीनुसार कामाचे नियोजन करत पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढल्या आहेत. ठराविक ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी अन्य ठेकेदारांवर दबाब आणला जात असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. त्यापाठोपाठ आता छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालयातील औषधालय भाडे तत्वावर देण्याची निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

…असे जाहीर केले असते तर लाज तरी वाचली असती –

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील औषधालय गेल्या काही वर्षांपासून बंद असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी पालिका प्रशासनाने निवदा काढल्या आहेत. रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावी यासाठी जेनेरीक औषधालय सुरु करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. या निर्णयानुसार पालिकेने रुग्णालयातील औषधालय भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढल्या आहेत. परंतु या निविदेतील अटी व शर्तीमुळे ही निविदा वादात सापडली असून याच मुद्द्यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर टीका केली आहे. ”एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा ही निविदा एका कंपनीला देणार आहोत, असे जाहीर केले असते तर लाज तरी वाचली असती.”, अशी टीका करत त्यांनी महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्यावर निशाणा साधला आहे.

शासनाकडे आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणार –

निविदा करण्यासाठी अवघ्या आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच ३० वर्षांपासून औषधाचे दुकान असणे. वर्षाची आर्थिक उलाढाल १२० कोटींच्या घरात असणे, अशा अटी व शर्ती निविदेत देण्यात आल्या आहेत. यावरून मंत्री आव्हाड यांनी बुधवारी रात्री ट्वीट करून ठाणे मनपा प्रशासनावर टीका केली आहे. तर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांना निवेदन देऊन निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. ”ठाण्यातील सामान्य औषध विक्रेत्याला ही निविदा दाखल करता यायला हवी. पण, २४ मार्चला ही निविदा जाहीर झाली. त्याच दिवशी कळवा केमीस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशने आयुक्तांना पत्र देऊन जाचक अटी व शर्ती बदलण्याची मागणी केली होती. एका औषध कंपनीच्या फायद्यासाठीच ही निविदा काढण्यात आलेली आहे. ठाण्यातील कोणताही औषधविक्रेता ही निविदा भरु शकत नाही.”, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत शासनाकडे आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणार आहोत. कारण, अनेक निविदा या विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी काढण्यात ठाणे मनपाचे अधिकारी आघाडीवर असतात, हा इतिहास आहे, असा आरोपही त्यांनी केला.

…भ्रष्टाचार कुठे करायचा याचे तरी भान ठेवा – आव्हाड

”एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा ही निविदा एका कंपनीला देणार आहोत, असे जाहीर केले असते तर लाज तरी वाचली असती. शर्ट एकाच्या मापाचा शिवून घ्यायचा आणि बाजारात विकायला ठेवायचा. कोणाला घालता येतो का बघायला. घेणारा माणूस एकच असतो, ज्याच्या मापाचा शर्ट शिवलेला असतो. रुग्णालयात गँगरीनची शस्त्रक्रीया होत नाही. तिथे महिलांना सुविधा उपलब्ध नाहीत. पाणी उपलब्ध नाही. डॉक्टर जागेवर नाहीत. प्रसुती केंद्र बंद आहेत. आता काय औषधांच्या गोळ्या उंदरांसाठी वापरणार आहात का? भ्रष्टाचार कुठे करायचा याचे तरी भान ठेवा. मनिष जोशी या कलाकाराला सलाम. ही तक्रार औषध दुकानदारांच्या संघटनेने माझ्याकडे केली आहे.”, असे ट्वीट मंत्री आव्हाड यांनी करत पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.