ठाणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) उत्तरप्रदेशातून आणखी तीनजणांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली असून, फरार मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. या अटकसत्रामुळे पेपरफुटी मागील मोठी साखळी उघड होण्याची चिन्हे आहेत.

सोनू सिंह, मिथुन सिंह आणि कपिल दहिया अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या भिवंडीतील डोंगराळ भागात कोनगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत टीईटी प्रश्नपत्रिकांच्या प्रती जप्त केल्या होत्या. याप्रकरणात राजीव शाव, आकाश कुमार आणि धीरज सिंग या तिघांना अटक करण्यात आली होती.

या पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. दरम्यान, याप्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमले असून या पथकामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिल्ली, आग्रा, बिहार आणि हरियाणापर्यंत वाढली आहे.

विजेंद्र गुप्ता हा या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची बाब याप्रकरणाच्या तपासादरम्यान निष्पन्न झाली. तो आणि त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्यांचा विविध राज्यांत शोध सुरू आहे. दरम्यान, विजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी गुप्ता (३५) हिचे नावही याप्रकरणात समोर आले.

ती फरार विजेंद्रच्या सतत संपर्कात असल्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासातून उघड झाले. त्यामुळे एसआयटीने तिला बिहारमधील पाटणा येथून अटक केली. त्यापाठोपाठ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील उत्तरप्रदेश येथून सोनू सिंह, मिथुन सिंह आणि कपिल दहिया या तिघांना पथकाने अटक केली. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे.