Who is IPS Punjabrao Ugale:: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांची विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीचे नेतृत्व ठाणे पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे.

टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ठाणे पोलिसांनी भिवंडी परिसरात कारवाई करत या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. हे आरोपी दिल्लीहून महाराष्ट्रात आल्याची माहिती समोर आली असून, तब्बल दीड कोटी रुपयांना पेपर विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहेत, पेपरफुटीचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता एसआयटीकडून केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ठाणे पोलिसांच्या एसआयटीमार्फत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंजाबराव उगले कोण आहेत?

पंजाबराव उगले हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर ठाणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पश्चिम प्रादेशिक विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

काही काळापूर्वी त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. १५ मे रोजी गृह विभागाने त्यांची बदली पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून केली होती.

मात्र, काही दिवसांतच त्यांची पुन्हा ठाणे पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या अपर पोलीस आयुक्त पदाचे उन्नतीकरण करून पंजाबराव उगले यांची सह पोलीस आयुक्त (गुन्हे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने या प्रकरणात एसआयटीकडून कोणते नवीन धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.