करोना संकटामुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकलेला नसून यंदा करोनाचे संकट कमी झाल्याने दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असल्याचे दिसून येते. संपुर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून या उत्सवाच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते उपस्थिती लावणार आहेत. राज्यात झालेला सत्ताबदल आणि आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले असून या उत्सवाच्या निमित्ताने यंदा ठाण्यात राजकीय दहीहंड्यांचा थरार पहाव्यास मिळणार आहे.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या हंड्या फोडणाऱ्या पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येतात. या बक्षिसे मिळविण्यासाठी मुंबई तसेच आसपासच्या शहरातील गोविंदा पथके ठाण्यात येतात. त्यामुळेच ठाणे शहराला गोविंदांची पंढरी म्हणून संबोधले जाते. परंतु गेले दोन वर्षे करोना संकटामुळे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नव्हता. यंदा करोनाचा संसर्ग कमी झाला असून राज्य शासनाने सण, उत्सवांवरील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे शहरातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. तर, ठाणे शहरातील पुरुष आणि महिला गोविंदा पथकांनीही गेल्या काही दिवसांपासून दहीहंडीचा सराव सुरु केला आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली. ही दहीहंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. हा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, अशी माहिती माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. घोडबंदर भागात भाजप प्रणित स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवात एकूण ५१ लाखांची बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या ग्रामीण भागातील ७५ हजार महिलांची कॅन्सर तपासणी करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने केला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक, स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, खासदार राजन विचारे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते उपस्थिती लावणार आहेत.

ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी फोडणाऱ्या मंडळांकरिता लाखो रुपयांची बक्षिसे आयोजकांनी जाहीर केली आहेत. याशिवाय, थर लावून सलामी देणाऱ्या पथकांनाही रोख रक्कमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. यामुळे यंदा गोविंदांचा उंच थर रचण्याचा थरार ठाणेकरांना पहाव्यास मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यात झालेला सत्ताबदल आणि आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने यंदा ठाण्यात राजकीय दहीहंड्यांचा थरार पहाव्यास मिळणार आहे.