ठाणे : ठाणे पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांनी मुंबईतील एका दाम्पत्याला धमकावून त्यांच्याकडून ५० हजार रुपये उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन ) श्रीकांत पाठक यांनी तिघांना तातडीने निलंबित केले आहे.

पोलीस शिपाई जयेश आंबिकर, राकेश कुंटे आणि महिला पोलिस शिपाई सोनाली मराठे अशी निलंबित करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील जयेश आणि राकेश या दोघांची नेमणूक ठाणे पोलिस मुख्यालयात होती आणि ते पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट वाहनावर नेमणूकीला होते. तर, सोनाली यांची नेमणुक शीळ डायघर पोलीस ठाणे येथे होती. आंबिकर, कुंटे आणि मराठे यांनी ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठांच्या कोणत्याही परवानगी विनाच आयुक्तांचे एस्कॉट वाहन घेऊन मासुंदा तलाव येथे आले. तिथे जेवणासाठी आलेल्या मुंबईतील एका विवाहित दाम्पत्याला त्यांनी धमकावले. त्यांना एका पांढऱ्या स्कॉर्पिओ बसवून ‘इकडे लफडे करायला मुलीला घेऊन येतो का’ तुझ्या आई वडिलांचा नंबर दे, असे सांगत यातील पुरुषाला हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्यावर कारवाई करू नये यासाठी पुरुषाकडून ४० हजार ५०० रुपये मारुफ खान या व्यक्तीच्या गुुगल पेवर ट्रान्सफर करण्यास लावले. तर त्यांच्या पत्नीला मीनाताई ठाकरे चौक येथील एका एटीएम केंद्रात घेऊन गेले आणि डेबिट कार्डद्वारे तिच्याकडून दहा हजार रुपये रोख जबरदस्तीने घेतले. कोणताही कसूर नसतांना अशा प्रकारे पोलिसांच्या नावाखाली लुटणाऱ्या त्रिकुटाविरुद्ध या जोडप्याने त्याच रात्री नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पैसे खासगी व्यक्तीला गेले. मात्र पैसे घेणारे हे पोलिसच आढळले. या प्रकाराची माहिती मिळताच ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नौपाडा पोलिसांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्याच चौकशीच्या आधारे या तिघांनाही गुन्हेगारी स्वरुपाचे गंभीर स्वरुपाचे कृत्य केल्याच्या तसेच पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा आणणारे कृत्य करुन पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ठाणे अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन ) श्रीकांत पाठक यांनी तिघांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबित आदेश

या तिघा पोलिस शिपाईंनी निलंबन कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय, येथे दररोज न चुकता हजेरी दयावी. त्यांना ठाणे पोलीस उप आयुक्त, मुख्यालय-२ यांच्या पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. पुर्व परवानगीविना मुख्यालय सोडल्यास त्यांचेविरुध्द अन्य शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या तिघांनी निलंबन कालावधीमध्ये कोणतीही खाजगी नोकरी स्विकारु नये किंवा कोणत्याही व्यापारात अथवा धंदयात स्वतःला गुंतवू नये. तसेच त्यांनी त्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी स्वियेत्तर सेवा आणि बडतर्फी, निंलबन व सेवेतुन काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ मधील नियम ६९ पोटनियम (४) अन्वये आवश्यक असलेले प्रमाणपत्र दिल्याखेरीज त्यांना निर्वाहभत्ता देण्यात येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलंबन कालावधीमध्ये त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारली अथवा कोणताही व्यापार किंवा धंदा केला तर महाराष्ट्र नागरी सेवा, वर्तणूक नियम-१९७९ मधील नियम १६ चा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यास ते पात्र राहतील, असे निलंबित आदेशात ठाणे अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन ) श्रीकांत पाठक यांनी म्हटले आहे.