ठाणे शहरातील प्रसिद्ध तीन हात नाक्याचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मराठा मोर्च्याच्या आयोजकांकडून यासंबंधीचा प्रस्ताव ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रस्तावात तीन हात नाक्याचे नाव बदलून मराठा क्रांती चौक असे करावे, असे म्हटले आहे. यापूर्वी ठाण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमुळे तीन हात नाक्याचे नामांतर मॅरेथॉन चौक असेही करण्यात आले होते. त्यामुळे आता या नव्या प्रस्तावाचे काय, होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या प्रस्तावाला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. येत्या महासभेत आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेणार असल्याचे संजय मोरे यांनी सांगितले.

मराठा क्रांती मूक मोर्चा आयोजन समितीने मुंबईत रविवारी जनजागृती बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध शहरांमध्ये प्रचंड संख्येने निघालेल्या मराठा मोर्चानंतर आता मुंबईतही लवकरच मराठा मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चाची वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि मराठा तरुण-तरुणींना एकत्र आणण्यासाठी ‘जनजागृती दुचाकी रॅली’ काढण्यात आली. ही रॅली सोमय्या मैदानातून सुरू होऊन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पुन्हा सोमय्या मैदानात आली. सकाळी १० वाजता कोपर्डी घटनेतील पीडित तरुणी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशा मराठा समाजाच्या मागण्या आहेत.