ठाणे : शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांसह शहर विद्रूप करणाऱ्या पोस्टर-बॅनरविरोधात ठाणे महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये एकाचदिवशी ५३ अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करत गुटखा, पानमसाला, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले, तर शहरातील विविध भागांत १३५ अनधिकृत पोस्टर्स-बॅनर्स हटविण्यात आले.

ठाणे शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि शहर विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या पोस्टर्स-बॅनर्सविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई उपायुक्त अतिक्रमण जितेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे आणि दिनेश तायडे यांच्या समन्वयातून करण्यात आली. प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासन विभागाने कारवाई केली. या मोहिमेत एकूण ५३ अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गुटखा, पानमसाला, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

सिडको येथील बेडेकर महाविद्यालयासमोरील टपरी, महागिरी येथील ठाणे पोलीस स्कूलसमोरील टपरी, एन.के.टी. महाविद्यालयासमोरील टपरी तसेच जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराशेजारील टपरीवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणांहून गुटखा, पानमसालाजन्य पदार्थ, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. चरई येथील दगडी स्कूल आणि महाराष्ट्र विद्यालयासमोरील टपऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. तसेच राम मारुती रोड येथील शिव समर्थ स्कूलसमोरील टपरीवर कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेट जप्त करण्यात आल्या.

दरम्यान, महापालिकेने विविध प्रभाग समिती क्षेत्रांत अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवरही कारवाई केली. नौपाडा-कोपरी येथे २१ पानटपऱ्या, वर्तकनगर येथे २ पानटपऱ्या आणि २ हातगाड्या, उथळसर येथे २ पानटपऱ्या आणि ५ हातगाड्या, कळवा येथे १ पानटपरी आणि १० हातगाड्या, मुंब्रा येथे ११ पानटपऱ्या आणि ८ हातगाड्या, माजिवडा-मानपाडा येथे ७ पानटपऱ्या आणि १२ हातगाड्या, दिवा येथे २ पानटपऱ्या आणि ५ हातगाड्या, तर लोकमान्य सावरकरनगर येथे ७ पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

१३५ पोस्टर्स-बॅनर्सवरही हातोडा

शहर विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाने अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सविरोधातही विशेष मोहीम राबवली. २२ जुलै रोजी शहरातील विविध प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये दिवसभरात १३५ बॅनर हटविण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये दिवा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक ७८, लोकमान्य सावरकरनगरमध्ये १६, नौपाडा-कोपरीमध्ये १२, वर्तकनगरमध्ये ११, माजिवडा-मानपाडामध्ये ११ आणि वागळे प्रभागात ७ कारवाई करण्यात आल्या. अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या तसेच पोस्टर्स-बॅनर्सविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.