ठाणे : ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात मृत भटक्या श्वानांच्या अंत्यसंस्काराची अधिकृत नोंदच ठेवली जात नसल्याचा आरोप प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
माजिवाडा येथील प्राण्यांच्या स्मशानभूमीत महापालिकेकडून अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येणाऱ्या मृत श्वानांची अधिकृत नोंद ठेवली जात नसल्याची बाब समोर आली आहे. स्मशानभूमीतील नोंदणी अधिकाऱ्यानेही ही बाब मान्य केल्याचे प्राणीप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेच्या अखत्यारितील श्वानाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची विल्हेवाट नेमकी कशी लावली जाते, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच वागळे इस्टेट येथील डॉग पाउंडमध्ये नसबंदीसाठी आणलेल्या श्वानांची प्राथमिक नोंद केली जाते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांची सुटका कधी झाली, त्यांना कोणत्या परिसरात सोडण्यात आले किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद कुठे केली जाते, याबाबत स्पष्टता नाही. पालिकेच्या ताब्यातील ५० हून अधिक श्वानांची माहिती नसल्याचा दावा प्राणीप्रेमी कार्यकर्ते झेव्हियर सॅन्टीआगो यांनी केला आहे.
प्राणी कल्याण अधिकारी, खासगी संस्था संशयास्पद
उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्राणी कल्याण अधिकाऱ्यांशी संबंधित कासारवडवली येथील खासगी संस्थेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पालिकेने भटके श्वान खासगी संस्थेकडे सोपविणे, तसेच शस्त्रक्रियेनंतर त्यांना त्यांच्या मूळ परिसरात न सोडणे याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.
मृत श्वानांना सिमेंटच्या गोणीतून स्मशानभूमीत आणले जात असल्याचा आणि अधिकृत लेटरहेडऐवजी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक ओळखपत्रे वापरली जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
लोकमान्य नगर येथे मृत गायीच्या अंत्यविधीबाबत झालेली कथित हेळसांड तसेच रेबीजग्रस्त श्वानाच्या प्रकरणातील पालिकेच्या कार्यपद्धतीवरही पाचंगे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
भटक्या प्राण्यांचे जन्मनियंत्रण, उपचार आणि व्यवस्थापन वेळेत होत नसल्याने प्राणीमित्र आणि सोसायटीतील रहिवाशांमधील वाद वाढत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
निरोगी श्वानांना संसर्गाचा धोका
एका रेबीजबाधित श्वानाचा मृतदेह ज्या डॉग व्हॅनमधून नेण्यात आला, त्याच वाहनातून अन्य निरोगी श्वानांची नसबंदी शस्त्रक्रियेसाठी वाहतूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशा घटनांची नोंद ‘भारत पशुधन पोर्टल’वर करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केला आहे.
पालिकेच्या ताब्यातील श्वानांचा कोणताही मागमूस नाही. या श्वानांचे काय झाले, याची अधिकृत नोंद, देखरेख आणि विल्हेवाटीची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी. मृत्यूची नोंद नसेल तर त्यामागचे कारण द्यावे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी – व्हियर सॅन्टीआगो, प्राणीप्रेमी कार्यकर्ता, ठाणे</strong>
