ठाणे : टीएमटी बसमध्ये महिलांच्या रांगेत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला जाब विचारले असता, संबंधित प्रवाशाने वाहकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वाहकाच्या डोळ्याजवळ दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीएमटीमध्ये २०१७ पासून वाहक म्हणून कार्यरत असलेले सुरेश राठोड (४५) हे सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सिडको बसथांबा ते भिवंडी येथील काल्हेर या मार्गावरील बसगाडीवर वाहक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री सुमारे ९.५० वाजता सिडको येथून पूर्णाकडे जाणारी शेवटची फेरी सुरू होणार होती. त्यावेळी सिडको बसथांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होती.

गर्दी लक्षात घेऊन राठोड यांनी महिलांना बसच्या पुढील प्रवेशद्वारातून आणि पुरुषांना मागील प्रवेशद्वारातून बसमध्ये चढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, महिलांच्या रांगेतून एक पुरुष प्रवासी पुढील दरवाजातून बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. राठोड यांनी त्याला याबाबत जाब विचारताच तो संतापला. त्याने शिवीगाळ करत राठोड यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याजवळ दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर उपस्थित प्रवाशांनी हस्तक्षेप करून दोघांनाही ठाणेनगर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी चौकशी केली असता, मारहाण करणाऱ्या प्रवाशाची ओळख काल्हेर येथील रहिवासी नितीन तलास्कर अशी पटली. त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.