ठाणे : ठाणे शहरात प्रवाशांच्या सेवेसाठी नव्याने दुमजली टीएमटी बसगाडी सुरु झाली आहे. टीएमटीच्या दुमजली बसगाडीमध्ये प्रवाशांच्या डोक्यावर छप्पर असले तरी मागील काही वर्षांपासून बसगाडीचे अनेक प्रवासी थांबेच गायब झाले आहेत. विविध प्रकल्पांची कामे, रस्ता रुंदीकरण यामुळे बसगाडीचे थांबे तुटले आहेत. बसथांब्या अभावी प्रवाशांना मात्र उन्हात थांबून बसगाड्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे.
ठाणे शहरात महापालिकेद्वारे परिवहन सेवेच्या टीएमटी बसगाड्यांची वाहतुक होते. परंतु बसगाड्यांच्या संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी असल्याने बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नुकतीच ठाणे शहरात पहिली दुमजली बसगाडी दाखल झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसगाडीचे लोकार्पण करण्यात आले. ही बसगाडी गायमुख ते तीन हात नाका अशी धावणार आहे. असे असले तरी ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मेट्रो मार्गिका निर्माण कामे, रस्ता रुंदीकरण प्रकल्पांची कामे अशा विविध प्रकल्पांसाठी रस्ते खोदकामे करण्यात आली. त्यासाठी अनेक भागात पदपथ किंवा रस्त्यालगतचे टीएमटीचे बसगाडी प्रवासी थांबे काढण्यात आले. त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
मागील काही दिवसांपासून उन्हाच्या प्रचंड झळा बसत असताना प्रवासी थांबे गायब झाल्याने उन्हामध्ये प्रवासी हैराण झाले आहेत. शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर, माजिवडा, कळवा, मुंब्रा, दिवा भागात अनेक ठिकाणी बसथांबे नसल्याने रणरणत्या उन्हात उभे राहून प्रवाशांना बसगाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे. अनेक बसगाडी थांब्याजवळ वृक्ष किंवा बसण्यासाठी जागा नाही. यामध्ये महिला आणि बालकांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकदा उन्हामुळे प्रवासी नाइलास्तव रिक्षाने प्रवास करतात.
टीएमटीचे पूर्वी ४७० बसगाडी थांबे होते. काही वर्षांपूर्वी एका जाहीरात कंपनीकडे बसगाडी थांब्याच्या देखभाल दुरुस्तीचे कामे जाहीरात प्रदर्शनाच्या बदल्यात देण्यात आले होते. परंतु बसथांबे विविध प्रकल्पात काढले गेले. त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले. सध्या २२५ किंवा त्यापेक्षाही कमी बसगाडीचे थांबे शिल्लक आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीने सुमारे तीन वर्षांपूर्वी न्यायालयात धाव घेतली आहे.
टीएमटी बसथांब्याची देखभाल दुरुस्ती जाहिरात कंपनीकडे होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. – भालचंद्र बेहरे, व्यवस्थापक, टीएमटी परिहन विभाग.
टीएमटीचे बसथांबे नसल्याने उन्हाळ्यात उन्हाचे चटके तर पावसाळ्यात पावसाचा मारा सहन करावा लागतो. अनकेवर्ष ही परिस्थिती बदलली नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. – निकीता पटेल, प्रवासी.
