ठाणे – ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टिएमटी) ताफ्यात एकूण दहा विद्युत वातानुकूलीत डबलडेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी पहिली बसगाडी गुरूवारी टिएमटीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या बसगाडीची नोंदणी प्रक्रीयाही सुरू करण्यात आल्याने येत्या पंधरा दिवसांत ही बसगाडी प्रवासी वाहतूकीसाठी उपलब्ध होणार आहे. ही बसगाडी ठाणे ते घोडबंदर मार्गावर चालविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाख इतकी असून शहरास १३५० बसगाड्यांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत टिएमटीच्या ताफ्यात ४०७ बसगाड्या असून त्यापैकी ३८१ बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या बसगाड्या शहरातील अंतर्गत तसेच शहराबाहेरील मार्गावर चालविण्यात येतात. शहरातील प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून टिएमटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असून यातूनच टिएमटीच्या ताफ्यात ३७० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. या बसगाड्या वर्षाअखेरपर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यात पीएम ई बस योजनेतून १०० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, १५ व्या वित्त आयोगातून १६० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, १०० सीएनजी, १० डबलडेकर बसगाड्यांचा समावेश आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या ७७७ इतकी होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आधीपासूनच डबलडेकर बसगाड्या आहेत. टिएमटीच्या ताफ्यात मात्र अशा बसगाड्या उपलब्ध नव्हत्या. पहिल्यांदाच अशा बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय टिएमटी प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी घेतला. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. टिएमटीच्या ताफ्यात एकूण १० विद्युत वातानुकूलीत डबलडेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी पहिली बसगाडी गुरूवारी घोडबंदर येथील आनंदनगर आगारात दाखल झाली. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ही बसगाडीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असून त्याचबरोबर या बसगाडीची प्रादेशिक परिवहन विभागातील नोंदणी प्रक्रीयाही प्रशासनाने सुरू केली आहे. या प्रक्रियेनंतर पंधरा दिवसांत ही बसगाडी रस्त्यावर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
घोडबंदर मार्गावर बस धावणार
ठाणे शहरातील अनेक मार्ग हे अरुंद आणि दाटीवाटीचे आहे. काही ठिकाणी उड्डाणपुल आहेत. या मार्गावर डबलडेकर बस चालविणे शक्य होणार नाही. घोडबंदर मार्ग हा रुंद असून येथून डबलडेकर बसगाडी विनाअडथळा प्रवासी वाहतूक करू शकते. टिएमटीच्या वातानुकीलीत बसगाड्या ठाणे ते बोरिवली मार्गावर चालविण्यात येत आहेत. या मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक मागणी असून येथून टिएमटीला मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे या मार्गावरच डबलडेकर बस चालविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. या वृत्तास परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दुजोरा दिला आहे.
ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील दहापैकी पहिली डबलडेकर बसगाडी दाखल झाली असून तीची नोंदणी प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ही बसगाडीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. असे असले तरी प्रादेशिक परिवहन विभागातील नोंदणी प्रक्रीयाही पुर्ण करून पंधरा दिवसांत ही बसगाडी रस्त्यावर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होईल, , अशी माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.
