ठाणे : ईद-ए- मिलाद सण बुधवारी साजरा करण्यात येत आहे. या सणाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाकडून मिरवणूक काढल्या जातात. या मिरवणुकीसाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

ईद- ए- मिलाद निमित्ताने भिवंडी , कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंब्रा शहरात मिरवणूका काढल्या जातात. यामध्ये मुस्लिम समाज मोठ्याप्रमाणात मिरवणूकांमध्ये सहभागी होतात. या पार्श्ववभूमीवर ठाणे पोलिसांनी बुधवारी दुपारी २ ते रात्री १० पर्यंत वाहतुक बदलाची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंब्रा येथील अनेक रस्त्यावर बुधवारी प्रवेशबंदी असणार आहे.

वाडा येथून भिवंडी शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राष्ट्रीय महामार्ग ८ येथून किंवा मुंबई महापालिका जलवाहिनी मार्गे वाहतुक करतील. वाडा येथून नदीनाका मार्गे भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा येथे प्रवेशबंदी असेल. हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवे वळण घेऊन खोणीगाव, तळवळी फाटा, कांबा रोड, वसई रोड मार्गे करावली किंवा विश्वभारती फाटा येथून गोरसईगाव मार्गे वाहतुक करतील.

वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांबोळी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धामणकरनाका जलवाहिनी येथे उजवे वळण घेऊन जलवाहिनी मार्गे वाडा किंवा त्यापुढे वाहतुक करु शकतील. तर बसगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाविंद्रा जकात नाका येथे उतरविले जाईल. ठाणे, कल्याण येथून जुना आग्रा रोड मार्गे वाडा आणि चाविंद्रा मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंप पुढे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पेट्रोल पंप जवळून उजवे वळण घेऊन नागाव मार्गे वाहतुक करू शकतील.

रांजनोली चौकातून भिवंडी शहरात वाहतुक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसगाड्या, कल्याण महापालिकेच्या परिवहन सेवेच्या केडीएमटी बसगाड्या, जड-अवजड वाहने, रिक्षा, मध्यम व हलक्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी असेल. जड-अवजड, मध्यम आणि हलकी वाहने रांजनोली नाका येथून वळसा घालून मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथून अंजुरफाटा किंवा वसई रोड किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकात नाका, जलवाहिनी मार्गे वाहतुक करतील. तर एसटी, केडीएमटी, रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रांजनोली नाका येथे उतरविले जाईल.

ठाणे शहरातील राबोडी येथील के. व्हीला नाका मार्गे आकाशगंगा, राबोडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी के. व्हीला येथे प्रवेश बंद”” करण्यात येते आहे. ही वाहने ”’के”’ व्हीला नाका येथून सरळ मिनाताई ठाकरे चौक रोडने जुनी राबोडी पोलीस स्टेशन मार्गे इच्छीतस्थळी जातील. कल्याण येथील पत्रीपुल एपीएमसी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या सर्व वाहनांना पत्रीपुल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने पत्रीपुल येथुन डावे वळण घेवुन गोविंदवाडी बायपास मार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

विठ्ठलवाडी येथील नेहरूनगर, उल्हासनगर जुने बस स्टॉप मेनरोड हिललाईन पोलीस स्टेशन समोरील रोड – नेताजी चौक भाटीया चौक कुर्ला कॅम्प रोड समतानगर रोड कैलाश कॉलनी या मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतुक तसेच रहदारी ही मिरवणुक पुढील चौकात मार्गस्थ केल्यानंतर वाहतुक तात्पुरत्या स्वरूपात वाहने उभी करण्यास बंदी असेल. त्या वाहनांना मुख्य रस्ता सोडुन आजुबाजुच्या पर्यायी मार्गावर वाहने उभी करण्यास मुभा देण्यात आली आहे. मुंब्रा येथील रेतीबंदर मार्गे मुंब्रा शहरात वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना रेतीबंदर येथे तसेच वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने रेतीबंदर मुंब्रा बाह्यवळण मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

रेतीबंदर मार्गे मुंब्रा शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी व सरकारी बसगाड्यांना रेतीबंदर येथे तसेच वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनातील प्रवासी रेतीबंदर भागात उतरतील अथवा मुंब्रा बाह्यवळण मार्गे इच्छितस्थळी जातील.