ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या रविवारी ठाण्यातील कोंडी सुटावी यासाठी आणखी काही प्रकल्पांचे थाटामाटात भूमीपुजन झाले. तीन हात नाका हा ठाण्यातील सर्वाधिक गर्दीचा चौक. तो टाळता यावा यासाठी आणखी शे-दोनशे कोटी रुपये खर्च करुन नवी मार्गिका याच भागात उभी केली जाणार आहे.
ठाण्यासारखा विकास सर्वत्र झाला पाहीजे असे शिंदे या कार्यक्रमात म्हणाले खरे मात्र विकासाच्या या भडीमारात ठाणेकरांचे वर्तमान कसे कोंडीमय झालय यावर मात्र कुणीही काहीही बोलायला तयार नाही, असा अनुभव सध्या ठाणेकरांना येऊ लागला आहे. सायंकाळच्या वेळेत मुंबईतून ठाणे आणि पुढे घोडबंदर हा प्रवास अडीच ते तीन तासांच्या घरात पोहचला असून प्रकल्पांच्या या रेट्याखाली ठाणेकरांची सुरु झालेली ही अभुतपूर्व कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडे कोणतेच पर्यायी उपाय नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा झाली. नवे सरकार, नवे मुख्यमंत्री आणि नवी मेट्रो. त्यामुळे या प्रकल्पाचे ठाणेकरांना कोण कौतुक होते. आज इतक्या वर्षानंतरही हा मेट्रो प्रकल्प प्रत्यक्षात कधी येईल याचे ठाम उत्तर कुणाकडेही नाही. मुंबई नाशिक महामार्गाचे रुंदीकरण, घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये विलनीकरण, साकेत- आनंदनगर उन्नत मार्गाचे निर्माण, अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचे निर्माण, ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग निर्माण अशा महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची कामे सध्या शहरात सुरु आहेत.
यातील मुंबई नाशिक महामार्ग आणि मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वीची आहेत. उर्वरित प्रकल्प एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरची आहेत. या प्रकल्पांची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागांकडून सुरु आहेत. दोन्हीही विभागाच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. या काळात या प्रकल्पांचा वेग पुरेशा प्रमाणात राखण्यात संबंधित यंत्रणांना फारसे यश आलेले नाही हे स्वत: बहुदा शिंदेही जाणतात. रडतखडत सुरु असलेल्या या कामांमुळे गेली आठ-दहा वर्ष ठाणेकर मात्र अजस्त्र अशा कोंडीत सापडले आहेत.
कालचा दिवस बरा होता अशी म्हणण्याची वेळ का येते आहे ?
मुंबई महानगरापासून सर्वात जवळचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या वाढ, जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा होत असलेला विस्तार यामुळे ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाहनांचा भार प्रचंड वाढत आहे. दर वर्षी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात ७० ते ८० हजार नव्या दुचाकींची आणि सुमारे १५ ते २० हजार नव्या चारचाकी वाहनांची नोंदणी होते. व्यवसायिक वाहनांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा हव्यात आणि प्रकल्पही हवेत असे सत्ताधिशांचे म्हणणे आहे.
ठाण्याचा विकास आता होणार नाही तर कधी होणार, असा सवालही ही मंडळी उपस्थित करतात. ठाणे बदलतय, विकास हवा वगैरे सारख्या गप्पा वरवर पहाता पटतीलही मात्र प्रकल्प रेटताना ठाणेकर कोंडी, प्रदुषण, नियोजनाच्या अभावामुळे होणारे हाल या गर्तेत अडकत आहे याचे उत्तर मात्र कुणीही द्यायला तयार नाही. मेट्रो आणि इतर संथगती कामामुळे घोडबंदरचा प्रवास तर नकोसा होऊन बसला आहे. पुर्व द्रुतगती महामार्गावरुन ठाण्यात सायंकाळच्या वेळेत पोहचायला दोन-अडीत तासांचा कालावधी लागत आहे.
कोपरी पुलाचे रुंदीकरण होताच ठाण्याचा प्रवास सुसह्य होईल ही आशा ठाणेकरांनी केव्हाच सोडून दिली आहे. आता नव्या उन्नत मार्ग पुर्ण होताच सर्व काही ठिक होईल असा नवा आशावाद निर्माण केला जात आहे. पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध रस्त्यांवरच खोदकामे सुरु झाली आहेत. असे असताना पर्यायी वाहतूकीसाठी पूरेसे मार्ग नाहीत. त्यातच अपूर्ण प्रकल्पांसोबत आणखी नव्या प्रकल्पांची कामे हाती घेतली जात आहेत.
रस्ता एक, प्रकल्प अनेक, कोंडी बहुमार्गावर ?
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक प्रकल्पांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये घोडबंदर मार्गावर मेट्रो चार, मेट्रो चार अ, सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलनीकरण या प्रकल्पांची कामे केली जात आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर मेट्रो चार, साकेत-आनंदनगर उन्नत मार्गिका निर्माण केली जात आहे.
नुकतीच एकनाथ शिंदे यांनी तीन हात नाका चौक भागात २०० कोटी रुपयांच्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमीपूजन केले. त्यामुळे या प्रकल्पाचीही उभारणी लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी चितेंची बाब ठरण्याची शक्यता आहे. उरण जेएनपीए बंदर, नाशिक, गुजरात भागातून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे प्रवास करतात. या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रो-चार आणि ‘मेट्रो-चार अ’ च्या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. असे असतानाच, दोन ते तीन वर्षांपूर्वी अचानक घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलिनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.
या कामासाठी रस्त्याची रुंदी, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि पर्यायी मार्ग यांचा पुरेसा विचार झाला नसल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. विशेष म्हणजे, या भागातील सेवा रस्त्यालगतचे अनेक गृहसंकुले आता थेट मुख्य मार्गालगत येणार आहेत. त्यामुळे भविष्यात अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. सेवा रस्त्यालगतच्या दुकानदारांनाही याचा फटका बसणार आहे. हा प्रकल्प नागरिकांची मते विचारात न घेता तयार केला जात असल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाविरोधात आंदोलने देखील करण्यात आली. परंतु सरकार काही कुणाचे ऐकायला तयार नाही.
नवे प्रकल्प, नवी डोकेदुखी? – हे सर्व प्रकल्प सुरु असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीन हात नाका येथे वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तीन हात नाका हा सर्वाधिक वर्दळीचा चौक आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेत येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. त्यातच, या चौकाजवळ आनंदनगर उन्नत मार्गिका, मेट्रो मार्गिकेची कामे सुरु असताना आता आणखी एका नव्या प्रकल्पासाठी खोदकामे होणार आहेत. दुसरीकडे घोडबंदर भागात अंतर्गत मेट्रो मार्गिकेच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पाला अनेकांचा विरोध आहे. प्रकल्पामुळे वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. तसेच, लोकवस्तीतून जाणाऱ्या या प्रकल्पामुळे अनेक नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत नागरिकांना अद्यापही अधिकृत माहिती दिली जात नाही. प्रशासनाने किमान मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इतर नवे प्रकल्प हाती घेणे अपेक्षित होते असे मत अनेकांचे आहे.
ठाणे जिल्ह्यात विविध स्वरूपाचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. शहरी भागातून जाणाऱ्या प्रकल्पांमुळे काही ठिकाणी नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असले, तरी प्रकल्प वेळेत आणि गतीने पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जात आहे. तसेच भूसंपादन प्रक्रियेतही जिल्ह्यात आवश्यक बदल करण्यात आल्याने त्याला गती मिळाली असून प्रकल्पांच्या कामात अडथळे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे.
ज्या ठिकाणी नागरिकांचा विरोध आहे, तेथे प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृती करून प्रकल्पांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले जात आहे. जड-अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून व्हावी, यासाठी ठाणे खाडी किनारी प्रकल्प, मुंबई-वडोदरा महामार्ग प्रकल्प, विरार-अलिबाग बहुउद्देशीय प्रकल्प तसेच साकेत-आनंदनगर उन्नत मार्ग यांसारख्या प्रकल्पांची कामे सुरु आहेत. भविष्यात या सर्व प्रकल्पांचा ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. – डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे.
