ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये सण-उत्सवांचा उत्साह सुरू झाला की एकीकडे वातावरणात आनंदाचे रंग भरतात; पण दुसरीकडे रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्नही तितकाच गंभीर होत जातो. आधीच अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या, सुरू असलेली विकासकामे आणि अपुऱ्या पार्किंगची समस्या यामुळे नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात सणासुदीच्या काळात रस्त्यांवर उभारल्या जाणाऱ्या मोठमोठ्या राजकीय कमानी, बॅनर आणि होर्डिंगची भर पडली की परिस्थिती आणखी बिकट होते. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. अशा परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रस्त्यांवर राजकीय कमानी उभारू नयेत, अशा स्पष्ट सूचना देणे आणि उभारल्यास कारवाईचा इशारा ही केवळ एका राजकीय पक्षाची अंतर्गत भूमिका नसून, त्याकडे व्यापक नागरिकहिताच्या निर्णयाच्या रूपाने पाहिले पाहिजे.

ठाणे जिल्ह्यातील झपाट्याने विस्तारलेल्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी हा आज केवळ गैरसोयीचा विषय राहिलेला नाही, तर तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा गंभीर प्रश्न बनला आहे. कार्यालयात जाणारा नोकरदार असो, शाळा-महाविद्यालयात जाणारा विद्यार्थी असो, रुग्णालयात जाणारा रुग्ण असो किंवा गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे निघालेला चाकरमानी असो वाहतूक कोंडीचा फटका प्रत्येकालाच बसतो. काही किलोमीटरच्या अंतरासाठी तासन्तास रस्त्यावर थांबावे लागणे, रुग्णवाहिकांना मार्ग मिळण्यात अडथळे निर्माण होणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वेग मंदावणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व इंधन वाया जाणे, या सगळ्याची किंमत शेवटी नागरिकांनाच मोजावी लागते.

त्यातच उत्सवांचा काळ आला की रस्त्यांची परिस्थिती अधिकच संवेदनशील होते. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडतात. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते, सार्वजनिक कार्यक्रम होतात, मंडप उभारले जातात आणि वाहतुकीवर आधीच अतिरिक्त ताण निर्माण होतो. अशा वेळी रस्त्याची आणखी काही जागा व्यापणारी मोठी कमान उभारली तर त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होतो. शुभेच्छा देण्यासाठी उभारलेली काही फुटांची कमान नागरिकांसाठी मात्र अनेक मिनिटांचा, कधी कधी तासांचा त्रास निर्माण करू शकते. हे वास्तव आता राजकीय पक्षांनीही गांभीर्याने स्वीकारण्याची वेळ आली आहे.

खरं तर राजकीय कमानी ही कोणत्याही उत्सवाची गरज नाही. त्या एखाद्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या शुभेच्छा व्यक्त करण्याचे माध्यम असू शकतात; पण त्या शुभेच्छांसाठी नागरिकांच्या प्रवासात अडथळा निर्माण व्हावा, ही बाब निश्चितच योग्य ठरू शकत नाही. राजकीय कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचे, पक्षाचे किंवा उत्सवाचे ब्रँडिंग करायचे असेल तर त्यासाठी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. सोशल मीडिया, डिजिटल माध्यमे, वृत्तपत्रे, इतर जाहिरात माध्यमे यांचा वापर करता येतो. त्यासाठी सार्वजनिक रस्त्याची जागा अडवण्याची आवश्यकता नाही.

याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली स्पष्ट सूचना महत्त्वाची ठरते. ‘रस्त्यावर राजकीय कमानी उभारू नका’ अशी भूमिका घेणे आणि त्यामागे नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा, हा उद्देश ठेवणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. राजकीय पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्यांना लोकप्रिय घोषणांपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होईल अशा गोष्टी करण्यास सांगतो, तेव्हा त्याचे अनुकरण होणे आवश्यक असते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ही भूमिका केवळ सूचना देण्यापुरती मर्यादित न राहता कार्यकर्त्यांनीही ती मनापासून पाळणे गरजेचे आहे.

कारण राजकारणात अनेकदा ‘आपल्या पक्षाची कमान सर्वात मोठी’, ‘आपल्या नेत्याच्या शुभेच्छांचा सर्वात मोठा फलक’, ‘संपूर्ण शहरभर आपल्या नेत्याचे बॅनर’ अशी अनाठायी स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेतून पक्षाचे अस्तित्व दाखवले जाते, नेत्यांचे फोटो झळकतात; पण त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी किंवा राजकीय कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा नागरिकांना आनंदच असतो; मात्र त्या शुभेच्छांमुळे नागरिकांचा रस्ता अडू नये, एवढीच अपेक्षा असते.

म्हणूनच आता ठाणे जिल्ह्यातील इतर सर्व राजकीय पक्षांनीही या भूमिकेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही कोणत्याही एका पक्षाची भूमिका म्हणून न पाहता ‘नागरिकहिताची भूमिका’ म्हणून स्वीकारली पाहिजे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर कमानी उभारू नयेत, अशा सूचना प्रत्येक राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्या, तर त्याचा परिणाम निश्चितच व्यापक होईल. त्यातून कोणत्या पक्षाची ताकद किती मोठी आहे, यापेक्षा कोणता पक्ष नागरिकांच्या प्रश्नांबाबत किती संवेदनशील आहे, हे दिसून येईल.

उत्सव हे नागरिकांना जोडण्यासाठी असतात, त्यांना त्रास देण्यासाठी नाहीत. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो किंवा इतर कोणताही सण या काळात शहरात आनंदाचे, उत्साहाचे आणि आपलेपणाचे वातावरण असले पाहिजे. मात्र जर उत्सवाच्या काळात घराबाहेर पडताना ‘आज किती वेळ ट्रॅफिकमध्ये अडकावे लागेल?’ हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत असेल, तर उत्सवाच्या आनंदावरच विरजण पडते. आपल्या शहरातील रस्ते आधीच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे क्षमतेपेक्षा अधिक ताणाखाली आहेत. त्यामुळे उपलब्ध रस्त्याची जागा अधिक अडवणाऱ्या अनावश्यक गोष्टी टाळणे ही काळाची गरज आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कमानी उभारल्यानंतर त्या केवळ काही तास किंवा एखाद्या दिवसापुरत्या राहतील असेही अनेकदा होत नाही. विविध उत्सवांच्या निमित्ताने उभारलेल्या कमानी आणि बॅनर अनेक दिवस रस्त्यांवर तसेच राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. शहर स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत दिसावे अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो; मग त्याच शहरातील रस्त्यांवर अनावश्यक जाहिराती आणि कमानी उभारून त्याचे विद्रूपीकरण करण्याची गरज काय?

आज ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहराने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबईच्या लगतचा परिसर सर्वच भागांमध्ये उत्सवकाळात वाहतुकीवर मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना रस्त्यांवरील अनावश्यक कमानी टाळण्याचे आवाहन केले, तर प्रशासनावरील ताणही कमी होईल आणि नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. राजकीय कमानी उभारून शुभेच्छा देण्यापेक्षा नागरिकांचा रस्ता मोकळा ठेवून त्यांना सुखकर प्रवासाची संधी देणे, हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. उत्सव नागरिकांसाठी आनंदाचा असावा, वाहतूक कोंडीचा नाही. आणि ही जाणीव एका पक्षापुरती मर्यादित न राहता ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली, तर या छोट्याशा निर्णयातून शहरांच्या वाहतुकीला आणि नागरिकांना उत्सव काळात मोठा दिलासा मिळू शकतो.