ठाणे : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री काढण्यात आलेला मेणबत्ती मार्च यामुळे ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. टॉवर नाका ते खारटन रोडवरील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळ स्मारकापर्यंत हा मार्च काढण्यात आला होता. बाजारपेठांमधील गर्दी आणि मार्चमुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ठाणे शहरातील नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. या भागातील रस्त्यांवरच दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असून, नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मंगळवारी सायंकाळी नौपाडा येथील गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाली आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हे रस्ते शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने कोंडीचा परिणाम आसपासच्या भागांतील वाहतुकीवरही झाला.

मुंबईत कामानिमित्त गेलेले नोकरदार सायंकाळी घरी परतताना या कोंडीत अडकले. त्यामुळे घरी पोहोचण्यास विलंब झाल्याने नोकरदारांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मेणबत्ती मार्च काढण्यात आला होता. टॉवर नाका येथून सुरू झालेला हा मार्च जांभळी नाका मार्गे खारटन रोडवरील आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळ स्मारकापर्यंत गेला. त्यामुळे टेंभी नाका आणि जांभळी नाका परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. आधीच बाजारपेठांमधील गर्दीमुळे वाहतूक मंदावलेली असताना मार्चमुळे या भागाला जोडणाऱ्या रस्त्यांवरील कोंडीत आणखी भर पडली.