Thane Traffic Jam Today Update News: मुंबई शहराचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर, नवी मुंबई येथील ठाणे बेलापूर या महत्त्वाच्या मार्गांवर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. जिल्ह्यात राज्य सरकारकडून सुरु असलेली प्रकल्प आणि जड वाहनांची वाहतुक यामुळे कोंडीमध्ये वाढ होत असल्याची तक्रार वाहन चालकांकडून केली जात आहे. वाहतुक कोंडीमुळे इंधन आणि प्रवासाचा वेळ देखील वाढत असल्याने नोकरदारांच्या कामकाजावर त्याचा सर्वाधिक परिणाम होत आहे.
ठाणे जिल्ह्यातून पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर, ठाणे-बेलापूर हे महत्त्वाचे मार्ग जातात. जिल्ह्यातील भिवंडी शहरात हजारो गोदामे आणि लाॅजिस्टिक आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गोदामे या भागात असल्याने हजारो जड-अवजड वाहनांची वाहतुक या मार्गाने होते. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी शहरातील हजारो हलकी वाहने पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतुक करतात. वाहनांची वाढती संख्या आणि तुलनेने अरुंद मार्ग यामुळे दररोज ठाणेकरांना या मार्गावर कोंडीचा सामना सहन करावा लागतो.
मेट्रो प्रकल्प, उन्नत मार्ग
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून एमएमआरडीएने मेट्रो चार आणि पाच मार्गिकेच्या निर्माणाची कामे, साकेत-कोपरी आनंदनगर उन्नत मार्गिका, घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडणे अशी विविध कामे हाती घेतली आहेत. परंतु हे प्रकल्पच आता कोंडीचे कारण ठरु लागले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी रेल्वे पूल, तीन हात नाका-हरित पथ, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, माजिवडा भागात साकेत-आनंदनगर उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. अनेकदा या मार्गावर सकाळी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने आणि रात्री मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर कोंडी होते. त्यामुळे कोपरी आनंदनगर ते माजिवडा हे १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यास तब्बल अर्धा ते पाऊण तास लागतो. जड वाहनांची वाहतुक या मार्गावरून अधिक असल्याने कोंडीत भर पडते.
घोडबंदर मार्गावर कोंडी कायम
घोडबंदर मार्गावरही अशीच परिस्थिती आहे. घोडबंदर मार्गावरून गुजरात, उरण जेएनपीटी येथून सुटणारी अवजड वाहने मोठ्याप्रमाणात वाहतुक करतात. या अवजड वाहनांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ आणि रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत परवानगी आहे. असे असले तरी अनेकदा अवजड वाहनाने वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन शहरात प्रवेश करतात असा आरोप प्रवासी करतात. अवजड वाहनांना प्रवेशबंदी असली तरी ट्रक,डम्पर, टेम्पो यासारख्या जड वाहनांना हे निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे ही जड वाहने मार्गावर आल्यास कोंडीचा भार वाढत असतो. नवी मुंबई येथील ठाणे -बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावरही अवजड वाहने तसेच इतर वाहनांचा भार वाढल्यास कोंडीचा सामना सहन करावा लागतो.
पावसाळ्यात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वाहतुक कोंडी होते. सप्टेंबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेतच अवजड वाहनांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे उद्योजकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. भिवंडीत सर्वाधिक गोदामे असल्याने अवजड वाहनांची वाहतुक जवळपास ठप्प झाली होती. अखेर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांतच अवजड वाहनांसाठी शिंदे यांनी घेतलेला निर्णय मागे घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय फिरवल्याची तेव्हा चर्चा होत होती.
महामार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास कोंडी होत असते. वाहतुक पोलिसांकडून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु असतात. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक पोलीस.
ठाणे शहरात ठिकठिकाणी खोदकामे सुरु आहेत. तसेच रस्ते देखील अरुंद आहे. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडायचे असल्यास वेळेचे नियोजन करावे लागते. – योगेश गांगुर्डे, प्रवासी.
