ठाणे : ठाणे शहरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागला. ठाणे शहरातील पूर्व द्रूतगती महामार्ग, घोडबंदर घाट मार्ग, ठाणे बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा मार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

ठाणे शहरातून लाखो नागरिक मुंबईत कामानिमित्ताने त्यांचा वाहनाने किंवा बसगाड्यांनी प्रवास करतात. परंतु सोमवारी सकाळी ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागला. शहरात सुरु असलेले विविध प्रकल्प, वाहनांचा भार आणि रस्त्यांची अवस्था यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पूर्व द्रूतगती महामार्गावर मुलुंड टोलनाका, कोपरी -आनंदनगर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण येथून मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.

घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याची अवस्था वाईट आहे. त्यातच अवजड वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे या घाट मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहन चालकांना अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण तास लागत होता. घाट मार्गावर चेना पूल ते फाऊंटन हॉटेल पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि ठाणे बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा मार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याने नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.