ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाणे शहरात सुरु असलेली आंदोलने आणि घोषणाबाजीविरोधात आलेल्या तक्रारींची दखल महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तांसह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी दोन दिवसांत नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यासह विविध अंतरिम निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची सुनावणी १६ नोव्हेंबरला होणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा भागातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर प्रदीप यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पूर्णेकर समर्थकांनी घोडबंदर भागात आंदोलन करुन रस्ता रोखला होता.

तसेच, वाहनांचे टायर जाळले होते. याप्रकारानंतर ठाण्यातील तिघांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आंदोलनांदरम्यान मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकांचा वापर करणे, रस्ते आणि पदपथ अडविणे तसेच टायर जाळण्याचे प्रकार घडत असल्याचे म्हटले होते. या कोंडीत वाहनचालक अडकून पडले, तर काही प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलनांमुळे रुग्णवाहिका, शालेय बसगाड्या, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. तसेच, मोठ्या आवाजातील घोषणाबाजी आणि ध्वनिक्षेपकांमुळे स्थानिक रहिवाशांची झोप, आरोग्य आणि मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे तक्रारदारांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकारांमुळे नागरिकांच्या शांततेने जगण्याच्या आणि मुक्त संचाराच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीची दखल घेत आयोगाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी अंतरिम निर्देश जारी केले आहेत. वागळे इस्टेट, कापूरबावडी आणि कासारवडवली पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीत झालेल्या मोर्चे आणि आंदोलनांसाठी तसेच ध्वनिक्षेपकांच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली होती का, याची तपासणी करून ४८ तासांत अहवाल सादर करावा, असे आयोगाने निर्देश दिले आहेत. तसेच, विनापरवानगी सार्वजनिक रस्ते अडवून आंदोलन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासही सांगितले आहे.

दरम्यान, ठाणे वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत संबंधित मार्गांसाठी वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यायी मार्गांचे नियोजन तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आंदोलनांच्या काळात रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेने पोलिसांच्या समन्वयाने सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत मंडप, मंच आणि अन्य संरचना हटवाव्यात, असेही आयोगाने म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून आयोगाच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी आणि त्याबाबतचा कृती अहवाल प्रतिज्ञापत्रासह सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होणार आहे. आयोगाने अद्याप या प्रकरणी कोणताही अंतिम निष्कर्ष नोंदवलेला नसून चौकशी पूर्ण होईपर्यंत अंतरिम निर्देश लागू राहणार असल्याचेही स्पष्ट केले. चौकट राज्य मानवी आयोगाकडे तीन तक्रारदारांनी दिलेली तक्रारीची प्रत आम्हाला प्राप्त झाली होती. परंतु या संदर्भातील आयोगाची नोटीस बुधवारी दुपारपर्यंत प्राप्त झाली नाही. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.