ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवणार्या काही प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या रविवारी थाटामाटात पार पडले. मात्र, शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या इतकी अत्यवस्थ झाली आहे की, वाहनचालक आणि प्रवासी यांचा संयम सुटू लागला आहे. मुंबईहून ठाणे आणि घोडबंदर या प्रवासासाठी दररोज अडीच ते तीन तास लागत असून, विकास प्रकल्पांच्या रेट्याखाली ठाणेकरांचा कोंडमारा होऊ लागला आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या मेट्रो मार्गिका उभारणीची कामे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ठाणे मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाली. मात्र, त्याला इतकी वर्षे लोटल्यानंतरही ठाणेकरांना मेट्रो प्रवासाचे पुण्य लाभलेले नाही. उलट मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे रस्ते वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत आहे.
मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण, घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरण, साकेत-आनंदनगर उन्नत मार्ग, अंतर्गत मेट्रो, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग या प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. यातील मेट्रो आणि महामार्ग रुंदीकरणाचा प्रकल्प वगळता अन्य सर्व प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आहेत. या प्रकल्पांचे अधिपत्य असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्या शिंदे यांच्याच खात्याअंतर्गत येतात. असे असले तरी उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात प्रकल्पांचा वेग राखणे या यंत्रणांना जमलेले नाही.
पायाभूत सुविधा हव्यात आणि प्रकल्पही हवेत, असे सत्ताधिशांचे म्हणणे आहे. ठाण्याचा विकास आता होणार नाही तर कधी होणार? असा सवाल ही मंडळी उपस्थित करतात. मात्र प्रकल्प रेटताना ठाणेकर कोंडी, प्रदूषण, नियोजनाच्या अभावामुळे होणारे हाल या गर्तेत अडकत आहेत, यावर कुणीही बोलत नाही. मेट्रो आणि इतर संथगती कामांमुळे घोडबंदरचा प्रवास नकोसा होऊन बसला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यात सायंकाळच्या वेळेत पोहचायला दोन-अडीच तासांचा कालावधी लागत आहे. कोपरी पुलाचे रुंदीकरण होताच ठाण्याचा प्रवास सुसह्य होईल, ही आशा ठाणेकरांनी केव्हाच सोडून दिली आहे. आता नवा उन्नत मार्ग पूर्ण होताच सर्व काही ठिक होईल, असा नवा आशावाद निर्माण केला जात आहे.
अंतर्गत वाहतूकही महामार्गावरून
उरण जेएनपीए बंदर, नाशिक, गुजरात भागातून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदरमार्गे प्रवास करतात. या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रो-४ आणि ‘मेट्रो-४ अ’च्या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. असे असतानाच, दोन ते तीन वर्षांपूर्वी अचानक घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलिनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी रस्त्याची रुंदी, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि पर्यायी मार्ग यांचा पुरेसा विचार झाला नसल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. विशेष म्हणजे, या भागातील सेवा रस्त्यालगतचे अनेक गृहसंकुले आता थेट मुख्य मार्गालगत येणार आहेत.
नवे प्रकल्प, नवी डोकेदुखी?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीन हात नाका येथे वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तीन हात नाका हा सर्वाधिक वर्दळीचा चौक आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेत येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. त्यातच या चौकाजवळ आनंदनगर उन्नत मार्गिका, मेट्रो मार्गिकेची कामे सुरू असताना आता आणखी एका नव्या प्रकल्पासाठी खोदकामे होणार आहेत.
दुसरीकडे घोडबंदर भागात अंतर्गत मेट्रो मार्गिकेच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाला अनेकांचा विरोध आहे. प्रकल्पामुळे वृक्षसंपदेवर कुर्हाड चालविली जाणार आहे. तसेच, लोकवस्तीतून जाणार्या या प्रकल्पामुळे अनेक नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात विविध स्वरूपाचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. शहरी भागातून जाणार्या प्रकल्पांमुळे काही ठिकाणी नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असले, तरी प्रकल्प वेळेत आणि गतीने पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जात आहे. अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून व्हावी यासाठी ठाणे खाडी किनारी प्रकल्प, मुंबई-वडोदरा महामार्ग प्रकल्प, विरार-अलिबाग बहुउद्देशीय प्रकल्प तसेच साकेत-आनंदनगर उन्नत मार्ग यांसारख्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. – डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे.
