ठाणे : होळी आणि धुळवड निमित्ताने ठाणे वाहतुक पोलिसांनी कारवाई नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ६८१ वाहन चालकांविरोधात कारवाई केली. यामध्ये १९६ मद्यपी चालकांचा सामावेश आहे. तर दुचाकीवर तीन जण प्रवास करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. ठाणे शहरात होळी आणि धुळवड निमित्ताने ठाणे शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ठाणे शहरासह विविध भागातून तरुण-तरुणी धुळवड निमित्ताने जमले

होते. अनेकजण मद्य पिऊन किंवा वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवित असतात. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात कारवाई करण्यास सुरुवात केली होती. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक विभागातील ४५० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात केले होते.

वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्या १ हजार ६८१ जणांवर कारवाई केली. पोलिसांच्या नाकाबंदीत १९६ मद्यपी चालक तावडीत सापडले. यासह विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ८३६, रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला बसून प्रवास करणे २२७, विरुद्ध दिशेने येणारे १४ आणि दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केल्याप्रकरणी ४०८ दुचाकीस्वारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

तसचे मद्यपी वाहन चालकांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. मद्य पिऊन दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल १९६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी १ हजार ६८१ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचे वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले.