ठाणे : कर्नाटकातून चोरलेल्या कारचा थरारक पाठलाग करत ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आश्रु हाके यांनी सिनेस्टाईल कारवाई करीत संबंधित वाहन हस्तगत केले होते. त्यांच्या या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच भविष्यातही अशाच शौर्यपूर्ण कामगिरीद्वारे पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे आवाहन केले.

दरम्यान, बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही हाके यांच्या कर्तव्यदक्षता आणि अतुलनीय धैर्याचे विशेष कौतुक करत त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे. लोणावळा ओलांडून चोरीची कार ठाण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती १० मे रोजी नियंत्रण कक्षाला मिळताच ठाणे शहर वाहतूक शाखा तत्पर झाली होती.

वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व कक्षांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. दरम्यान, चोरट्याने साकेत रोडमार्गे माजिवडा दिशेने वळण घेतल्याचे समोर येताच कापूरबावडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी आपल्या पथकाला सतर्क केले. माजिवडा चौकातील गोल्डन डायज परिसरात मद्यपी वाहन चालकांविरोधात नाकाबंदीसाठी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आश्रु हाके यांनी भरधाव वेगाने जाणारी संशयित किया सेल्टोस कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत घोडबंदर रोडच्या दिशेने पलायन केले. क्षणाचाही विलंब न करता आश्रु हाके यांनी एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी घेत तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत कारचा थरारक पाठलाग केला.

मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळमार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत हा सिनेमातील दृश्यांनाही लाजवेल असा पाठलाग सुरू होता. आरोपी चालक वारंवार पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत होता. तसेच इतर वाहनांनाही धडक देत बेदरकारपणे वाहन चालवत होता. अखेरीस कावेसर येथील विजय गार्डन सिग्नलजवळ वाहतूक कोंडीमुळे कारचा वेग मंदावताच हाके यांनी दुचाकीवरून उतरून दगड भिरकावत कार रोखण्याचा प्रयत्न केला. यात कारची मागील काच फुटल्याने चालक घाबरून कार सोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेकडे पळाला. दुभाजक ओलांडून पळणाऱ्या चोरट्यावर हाके यांनी पकडले. झटापटीत आरोपीचा शर्ट हाके यांच्या हाती आला, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

दरम्यान, हाके यांनी पकडलेली किया सेल्टोस (KA 22 MC 8122) ही कर्नाटक नोंदणीची कार असून ०९ मे रोजी बेळगाव परिसरातून चोरीस गेलेल्या दोन कारपैकी ही एक कार असल्याचे उघड झाले. राहुल जाधव यांच्या मालकीच्या या सेल्टोस कारमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आल्याने पोलिसांना तिचे लोकेशन ट्रॅक करता आले. या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल आश्रु हाके यांचा प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन सत्कार केला.