ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागासह ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे गेल्या एक ते दोन वर्षांपासून तीनतेरा वाजल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. ठाणे वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांना कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाय सापडलेला नसल्यामुळे कोंडीची समस्या कायम असून नवे उपायुक्त पंकज शिरसाट यांचे स्वागतही घोडबंदर भागात दोन दिवसांपासून होणाऱ्या कोंडीने झाले आहे. घोडबंदर मार्गावर वाहन उलटून झालेल्या कोंडीनंतरही अवेळी होणारी अवजड वाहतूक बंद करण्याऐवजी ती सुरूच ठेवण्यात येत असल्याने कोंडी भर पडत असून या नियोजन शुन्य कारभारामुळे नागरिकांना प्रवास नकोसा वाटू लागला आहे. देशाची आर्थिक राजधान असलेल्या मुंबईलगत ठाणे शहर येते. तसेच मुंबई महानगरातील महत्वाचे शहर म्हणून ठाणे ओळखले जाते. उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. ही वाहतूक ठाणे शहर आणि घोडबंदर भागातून होते. शहराचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाल्याने वाहन संख्येत वाढ झाली आहे. शहरात मेट्रो, रस्ते रुंदीकरण तसेच विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामामुळे आधीच रस्ते अरुंद झालेले आहेत. यामुळे ठाणे आणि घोडबंदर भागातील रस्त्यांवर कोंडी होत आहे. त्यात एखादे अवजड वाहन बंद पडले किंवा अपघात झाला तर मार्गावरील वाहतूकीचे तीनतेरा वाजतात. अंतर्गत मार्गही कोंडले जातात. त्याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला बसतो. गेल्या एक ते दोन वर्षांपासून हे चित्र सातत्याने दिसून येत आहे. ठाणे वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड आणि ठाणे महापालिका प्रशासनाने काही वाहतूक बदलाचे प्रयोग केले. पण, यामुळे कोंडी सुटण्याऐवजी त्यात वाढ झाल्याचे समोर आले. त्यामुळे हे बदल मागे घेऊन पुर्वीप्रमाणे वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामध्ये माजिवाडा चौकात बंद केलेला रस्ता खुला करण्यात आला. काही ठिकाणचे बदल मात्र कायम ठेवण्यात आलेले आहेत. या बदलानंतरही कोंडी सुटू शकलेली नाही. यामुळे तत्कालीन पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांना कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाय सापडलेला नसल्यामुळे कोंडीची समस्या कायम असून नवे उपायुक्त पंकज शिरसाट यांचे स्वागतही घोडबंदर भागात दोन दिवसांपासून होणाऱ्या कोंडीने झाले आहे. हे ही वाचा.गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात, जोड रस्ते, चौकही कोंडीत नियोजनशुन्य कारभार सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नोकरदार वर्गाची वाहने ठाणे आणि घोडबंदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येतात. यावेळेत वाहतूकीस अडथळा नको म्हणून अवजड वाहनांना वाहतूकीसाठी वेळा ठरवून देण्यात आलेेल्या आहेत. रात्री ११ ते पहाटे ५ तर, दुपारी १२ ते ४ यावेळेत अवजड वाहतूकीला परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु अवेळी अवजड वाहतूक सुुर असल्याने कोंडी होते. घोडबंदर मार्गावर वाहन उलटून अपघात झाल्यानंतर वाहतूक ठप्प होते. या काळात अवजड वाहतूक शहराबाहेरच रोखून धरणे आवश्यक आहे. पण तसे नियोजन होताना दिसून येत नाही. या उलट अवजड वाहतूक सुरूच ठेवल्याने कोंडीत भर पडते. माजिवाडा येथून कोलशेत भागात जाणारा मार्गाचे रुंदीकरण करण्यात आलेले आहे. घोडबंदर मार्गावर कोंडी झाल्यानंतर वाहने माजिवाडा-कोलशेत मार्गे वाहतूक करीत असल्याने तिथेही कोंडी होते. त्याचा फटका नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना बसतो. ठोस नियोजन होत नसल्यामुळेच कोंडी कायम असल्याचे चित्र आहे. हे ही वाचा.‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण घोडबंदर मार्गाला पर्यायी रस्ता नाही आणि त्यावर मेट्रो तसेच इतक कामे सुरू आहेत. याठिकाणी अपघात झाला तर, कोंडी वाढते. या मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून आणखी काय उपाययोजना करण्यात येतील, त्यावर विचार सुरू आहे. कोंडी झाल्यानंतर अनेकजण विरुद्ध मार्गावरून वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गिकांवर कोंडी होते. त्यामुळे नागरिकांनी असे करू नये. -पंकज शिरसाट पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा ठाणे