लोकसत्ता विशेष प्रतिनिधी ठाणे : बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, या उद्देशातून ठाणे वाहतूक पोलिसांनी ”रायडर्स” उपक्रम सुरू केला असून यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केला आहे. या क्रमांकावर गेल्या दोन दिवसात परिक्षेसाठी जाताना विलंब झालेल्या बारावीच्या २६ विद्यार्थ्यांनी संपर्क साधला असून त्यांच्या मदतीसाठी परिसरातील वाहतूक पोलीस (रायडर्स) तत्काळ धावून गेल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेवर पोहचण्यास मदत झाली.

बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे पोलिसांकडून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात परीक्षेच्या दिवशी केंद्रावर पोहचण्यास उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी या कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिस केंद्रापर्यंत पोहचविण्यास मदत करणार आहेत. या उपक्रमांसाठी वाहतूक पोलिसांनी विविध रस्त्यांवर ५४ रायडर्स तैनात केले असुन त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठे हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.

या उपक्रमाला बारावी परिक्षार्थी आणि त्यांच्या पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० फेब्रुवारी रोजी वाहतूक नियंत्रण कक्षात २५ कॉल तर, ११ फेब्रुवारी रोजी एकाच विद्यार्थ्याचा कॉल प्राप्त झाला. हेल्पलाईनवर संपर्क साधताच संबंधित परिसरातील वाहतूक पोलीस (रायडर्स) तत्काळ मदतीसाठी रवाना होत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी सिग्नल क्लिअर करणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक ठिकाणी वाहन एस्कॉर्ट देण्याची जबाबदारी पार पाडुन विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याकामी साहाय्य केले.

ठाणे वाहतूक शाखेच्या या संवेदनशील आणि विद्यार्थीहिताच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला असून पालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे ठाणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.

हेल्पलाईन क्रमांक

बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या रायडर्स उपक्रमासाठी वाहतूक पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक जाहिर केला आहे. यानुसार, ७०३९००३८६६, ८२८६३००३०० आणि ८२८६४००४०० या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.