ठाणे : नवी मुंबई येथील खारघर भागात ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने ठाणे वाहतुक पोलिसांनी ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून वाहतुक करणाऱ्या सर्व जड-अवजड (सहा ते १० चाकी) मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. त्यामुळे ठाणेकरांची दोन दिवस अवजड वाहतुकीतून सुटका होणार आहे.
श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्ताने २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी खारघर येथील ओवे मैदानात ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या वेळी लाखो नागरिक देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी शहरात अवजड वाहने प्रवेश करु शकणार नाहीत.
असे आहेत जड अवजड वाहनांसाठी वाहतुक बदल
- मुंबई, वसई, विरार येथून घोडबंदर, ठाणे शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गायमुख निरा केंद्र येथे प्रवेशबंदी असेल. तसेच खारेगाव टोलनाका, गॅमन जंक्शन, पारसिक चौक, मुंब्रा बाह्यवळण मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना पारसिक चौक येथे प्रवेशबंदी असेल.
- पनवेल येथून कल्याण फाटा, शिळफाटा मार्गे महापेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना शिळफाटा येथे प्रवेशबंदी असेल. कल्याण आणि ठाणे येथून दहीसर मोरी मार्गे पनवेल, नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना दहिसर मोरी येथे प्रवेशबंदी असेल. ठाणे येथून महापे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना पुजा पंजाब हाॅटेल येथे प्रवेशबंदी असेल.
- भिवंडी येथून जेएनपीटी नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी असेल. ठाणे ग्रामीण भागातील सोनाळे गाव, नाशिक मार्गे नवी मुंबई जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बासुरी हाॅटेल परिसरात प्रवेशबंदी असेल.
- गुजरात येथून घोडबंदर मार्गे ठाणे शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना ७२ गाळा परिसरात प्रवेशबंदी असेल. बापगाव येथून नवी मुंबई येथील जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना पत्रीपुल येथे प्रवेशबंदी असेल.
- बदलापूर, अंबरनाथ येथून बदलापूर जलवाहिनी मार्गे तसेच काटई, बदलापूर चौक येथून तळोजा बाह्यवळण मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना खोणी निसर्ग नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही प्रवेशबंदी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू असेल. अत्यावश्य सेवेतील वाहने यातून वगळण्यात आली आहेत.

