ठाणे : रेल्वेगाडीमध्ये प्रवास करताना एका प्रवाशाने धुम्रपान केले. या प्रवाशास एका प्रवाशाने रोखून धुम्रपान करु नको अशी विनंती केली असता, त्या प्रवाशाला त्याने मारहाण केली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या व्यक्तीने मद्यप्राशन केल्याचेही वैद्यकीय अहवालात समोर आले आहे.
यातील तक्रारदार हे दिवा येथे राहतात. ते बुधवारी रात्री कामानिमित्ताने कळवा येथे गेला होता. रात्री ११ वाजता तो पुन्हा दिव्याला येण्यासाठी कळवा रेल्वे स्थानकातून निघाला. रेल्वे डब्यामध्ये उभे असताना एक प्रवासी धुम्रपान करत असल्याचे त्याच्या निर्दशनास आले. सुरक्षेच्या दृष्टिने त्याने त्या प्रवाशास धुम्रपान करु नको अशी विनंती केली. या कारणावरुन त्या प्रवाशाने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दिवा रेल्वे स्थानक आल्यानंतर प्रवासी उतरू लागला. त्यावेळी धुम्रपान करणाऱ्या तरुणाने त्याला मारहाण केली. स्थानक परिसरातील पोलीस तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता, तो मद्याच्या नशेत असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.
याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे ११२, ११७, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,१९४९ चे ८५ (१) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२), २८०, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.