ठाणे : मुंबईत झाड पडून नागरिकांना आपला जीव गमावावा लागल्याच्या घटना उघडकीस आल्या असतानाच, ठाणे शहरातही झाड कोसळून एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. डोक्यावर झाड पडल्याने तो जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सुत्रांनी सांगितले. यानिमित्ताने झाडे पडण्याच्या घटनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात यंदाही झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात म्हणजेच ५ जुलै सकाळी ८.३० ते ६ जुलै सकाळी ८.३० या २४ तासांच्या कालावधीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण १८६ तक्रारी प्राप्त झाल्या.

यामध्ये ११० झाडे पडल्याच्या, ३८ झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या, १४ धोकादायक स्थितीतील झाडांच्या आणि ६ धोकादायक फांद्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. म्हणजेच झाडांशी संबंधित तब्बल १६८ तक्रारी नोंदविण्यात आल्या. झाडे कोसळून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असेल तरी या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करण्याचे काम केले. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असतानाच, झाडे पडण्याच्या घटनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे.

ठाणे येथील लुईसवाडीतील आरटीओ कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी पावसादरम्यान, झाड कोसळले. यावेळी तेथील रस्त्याने चालत असलेल्या धर्मवीरनगर येथील पांडुरंग भुवड या व्यक्तीच्या डोक्यावर झाड कोसळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, रुग्णवाहिका आणि जेसीबी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी झाड कापून बाजूला करण्याचे काम हाती घेतले. घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.