ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत मुसळधार पावसादरम्यान, वृक्ष उन्मळून पडत असल्याने नागरिका आणि पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही याचमुद्द्यावरून अनोखे आंदोलन करत पालिकेच्या कारभारावर टिका केली आहे. या आंदोलनादरम्यान, हरिनिवास भागातील वृक्षाभोवतीचे काँक्रीट हटवून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारपासून ‘काँक्रीटमुक्त वृक्ष’ ही मोहिम हाती घेतली आहे.

ठाणे शहरात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत होता. या पावसादरम्यान, शेकडो वृक्ष उन्मळून पडले. वृक्ष पडझडीच्या घटना वाढल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच, मनसेनेही शहरात आंदोलन करत संताप व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहराध्यक्षा समिषा मार्कंडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामध्ये हरी निवास सर्कल येथील झाडांच्या खोडाभोवती बसविण्यात आलेले सिमेंट पेव्हर ब्लॉक हटवून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली. त्यामुळे झाडांच्या मुळांना मोकळा श्वास घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.

ठाणे शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे सिमेंट आणि काँक्रीटच्या विळख्यात अडकलेल्या झाडांच्या खोडांची सुटका करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा शहराध्यक्ष मोरे यांनी यावेळी केली. गेल्या तीन दिवसांत साडेतीनशेहून अधिक वृक्ष उन्मळून पडण्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.