ठाणे – पावसाळ्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व वृक्षांचे वैज्ञानिक पद्धतीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. मंगळवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले. तसेच ही प्रक्रिया दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
ठाणे शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसादरम्यान झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळणे, फांद्या तुटणे आणि त्यातून नागरिकांचा मृत्यू तसेच जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आयुक्तांना निवेदन सादर करत शहरातील सर्व मोठ्या वृक्षांची तज्ज्ञांच्या माध्यमातून वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी केली.
आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार डावखरे यांनी पत्रकार परिषद घेतली. शहरातील शाळा, रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणांवरील वृक्षांना प्राधान्य देऊन हेल्थ ऑडिट करण्यात यावे. तसेच ही मोहीम एकदाच न राबविता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबविण्याची व्यवस्था करण्याची सूचना आयुक्तांना केल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे शहरात मेट्रो तसेच अनेक विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामादरम्यान अनेक झाडांच्या मुळांना इजा झाली आहे. अनेक वृक्ष बाहेरून हिरवेगार आणि सुरक्षित दिसत असले तरी आतून ते पोकळ, रोगग्रस्त किंवा कमकुवत झालेले असतात. अशा वृक्षांची वेळेत तपासणी न झाल्यास वादळी वारे किंवा मुसळधार पावसात ते कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वृक्षतोड हा एकमेव पर्याय नसून प्रत्येक वृक्षाची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेने हेल्थ ऑडिटदरम्यान वृक्षांची मुळे, खोडाची मजबुती, रोगग्रस्त स्थिती, फांद्यांचा भार आणि कोसळण्याचा संभाव्य धोका यांचे परीक्षण करावे. त्यानुसार धोकादायक वृक्षांवर छाटणी, उपचार किंवा आवश्यक असल्यास नियमानुसार हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि भविष्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा केली असून यावर आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही डावखरे यांनी सांगितले.
