ठाणे – ठाणे शहरात पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्षगणना आणि झाडांची आरोग्य तपासणी सुरू केले आहे. २ कोटी ३५ लाख रुपये खर्चून होणाऱ्या या प्रक्रियेत झाडांची जिओ टॅगिंगसह छायाचित्रे, आरोग्याची स्थिती आणि इतर तपशील नोंदवला जाणार आहे. मात्र, झाडे खरोखर धोकादायक आहेत की निरोगी, हे ठरविण्यासाठी कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणेऐवजी केवळ मानवी निरीक्षणावरच भर दिला जात असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहे. केवळ नजरेनेच एखादे झाड निरोगी आहे किंवा कसे हे ठरविले जात असल्यामुळे या संपुर्ण परिक्षणाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाणे शहरातील झाडे पडून जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना वाढत असतानाच, ठाणे महापालिका प्रशासनाने आता शहरातील झाडांची वृक्षगणना आणि झाडांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
१ जुलैपासून ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रात ही वृक्षगणनेसह झाडांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रभाग समितीनिहाय पथके नियुक्त करण्यात आली असून, झाडांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक झाडाचे छायाचित्र घेऊन त्याचे जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. तसेच झाडाची प्रजाती, स्थिती, आरोग्य आणि भविष्यातील संभाव्य धोका यासंबंधीची माहिती नोंदविण्याची प्रक्रिया या सर्वेक्षणात केली जात आहे. ठाणे शहरातील वृक्षगणना आणि झाडांच्या आरोग्य तपासणीसाठी सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. या प्रक्रियेतून शहरातील झाडांचा अद्ययावत संगणक माहितीसंग्रह तयार करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात धोकादायक झाडांची ओळख पटवून त्यावर वेळेत उपाययोजना करणे शक्य होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. पहिल्या टप्प्यात उथळसर आणि पाचपखाडी भागात हे सर्वेक्षण सुरू असून आतापर्यंत १८ हजार झाडांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. त्यापैकी १२ हजार झाडे विदेशी तर, ६ हजार झाडे देशी आढळून आली आहेत.
झाडाचे आरोग्य तपासताना मुख्यतः प्रत्यक्ष पाहणी आणि मानवी निरीक्षणावर भर दिला जात आहे. यामुळे झाडाच्या मुळांची, खोडाची किंवा अंतर्गत पोकळीची स्थिती केवळ नजरेने कितपत अचूकपणे समजू शकते, असा सवाल पर्यावरणप्रेमींमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून होणाऱ्या या वृक्षगणनेत केवळ झाडांची संख्या मोजण्यापेक्षा त्यांच्या आरोग्याचे शास्त्रीय पद्धतीने परीक्षण होणे गरजेचे आहे. अन्यथा झाडांची आरोग्य तपासणीच्या नावाखाली केवळ कागदी नोंदी आणि जिओ टॅगिंगपुरतीच ही प्रक्रिया मर्यादित राहण्याची शक्यता आहे. कोट ठाणे शहरात वृक्षगणना आणि झाडांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली असून यात प्रत्येक झाडाचे छायाचित्र घेऊन त्याचे जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. तसेच झाडाची पाहाणी करून त्याच्या आरोग्याची स्थिती नोंदवीली जात असून त्यात झाडासह मुळांना इजा, बुरशी आहे का, याची तपासणी केली जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील यांनी सांगितले.
तुमच्या डोळ्यांत एक्स-रे यंत्र असेल, तिसरा डोळा असेल किंवा काही सिद्धी प्राप्त असेल, तरच केवळ नजरेने काँक्रीटग्रस्त झाड किती धोकादायक आहे, हे ठरवता येईल. मात्र, आपण विज्ञानवादी असू, तर अशा पद्धतीने केली जाणारी झाडांची आरोग्य तपासणी थांबवायला हवी. बाजारात झाडांची अंतर्गत स्थिती तपासण्यासाठी अद्ययावत यंत्रणा आणि ती हाताळणारे तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच झाडांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. तसेच, महापालिकेने तज्ज्ञांची समिती गठीत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत निर्णय घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी दिली.
