ठाणे – ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित मागणी अखेर मार्गी लागली आहे. शहापूर, भिवंडी आणि मुरबाडमधील पात्र शिक्षकांना आता एकस्तर पदोन्नती योजनेंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी मिळणार आहे. याबाबत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित मोहन यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेकडो शिक्षकांना आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून नजीकची वरिष्ठ किंवा पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी देण्याची तरतूद आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील पात्र प्राथमिक शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. शहापूर, भिवंडीचा काही भाग आणि मुरबाडचा काही भाग पेसा क्षेत्रात येत असून, तेथे कार्यरत शिक्षकांना हा लाभ मिळावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात होती.
या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटना समिती आग्रही होती. कोकण विभागीय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष गणेश पोतदार यांनीही याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. नांदेड, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्य परिषदांप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांनाही या योजनेचा लाभ द्यावा, अशी भुमीका आमदार डावखरे यांनी मांडली होती.
या मागणीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित मोहन यादव यांनी २४ ऑक्टोबर रोजी शहापूर, भिवंडी, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. प्राथमिक शिक्षकांसाठी मुख्याध्यापक हे पद पदोन्नतीचे पद उपलब्ध असल्याने नियमानुसार पात्र शिक्षकांना त्या पदाची वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दुर्गम आणि आदिवासी भागात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. या निर्णयाबद्दल शिक्षकांनी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेऊन आभार मानले.
