ठाणे : ठाणे शहरात भव्य असे त्रिमंदिर उभे राहिले आहे. या मंदिरामुळे शहराची पवित्रता वाढलेली दिसत आहे. या मंदिराच्या कामासाठी आम्हाला काही करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी स्वत: ला भाग्यवान समजतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बाळकुम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात दादा भगवान परिवार, महावीर जैन ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिराची उभारणीचे काम अडीच वर्षांपुर्वी हाती घेण्यात आले. यातील त्रिमंदिराचे काम पुर्ण झाले असून त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्या दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्रिमंदिराला भेट दिली.यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ते म्हणाले, या त्रिमंदिरामुळे ठाण्यातील भूमी अधिक पवित्र बनली असून त्रिमंदिर हे भारतीय संस्कृतीच्या एकतेचे प्रतिक आहे. हे त्रिमंदिर ठाण्यासह संपूर्ण विश्वाचे आध्यात्मिक केंद्र बनेल. तसेच या मंदिर परिसरात विविध सुविधा देण्यासाठी मी स्वत: लक्ष घालेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

मंदिर उभारल्यानंतर या परिसराची पवित्रता किती वाढली आहे. पूर्वी हा परिसर कसा होता आणि आता कसा दिसतोय. हा खूप मोठा बदल झाला आहे. या मंदिरनिर्मितीमुळे ठाण्याची भूमी पावन झाली आहे. ठाणे शहरात अनेक आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम होतात. ठाणे हे सांस्कृतिक आणि धार्मिक शहर आहे. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. पण आज जो सोहळा येथे होत आहे, तो सर्वांपेक्षा वेगळा आणि विशेष आहे. आजचा हा सोहळा केवळ ठाण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा व गौरवाचा आहे, असे वक्तव्य शिंदे यांनी केले. या मंदिराच्या माध्यमातून जैन, वैष्णव, सनातन धर्मांना एकत्र आणणारा एक अद्वितीय प्रयत्न आहे, असे ही ते म्हणाले.

कर्करोग रुग्णालयाचे कामही लवकरच पूर्ण होईल… – कर्करोग रुग्णालयाचे काम देखील प्रगतीपथावर असून लवकर ते पूर्ण होणार आहे. कर्करोगावर मात करण्यासाठी औषध लागतातच, पण त्यासह प्रार्थनेची देखील तितकीच महत्त्वाची असते. यासाठी त्रिमंदिराच्या माध्यमातून सिमंदर स्वामीजींच्या आशीर्वादामुळे ते शक्य होणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.