scorecardresearch

ठाणे : पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

अन्य दोन कामगारांवर उपचार सुरू आहेत

ठाण्यामधील नौपाडा येथील हरिनिवास चौक भागात एका इमारतीच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा रासायनिक द्रव्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) उघडकीस आली आहे. विवेक कुमार (३०) आणि योगेश नरवनकर (३८) अशी मृतांची नावे असून, अन्य दोन कामगारांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हरिनिवास चौक येथे एका संस्थेची इमारत आहे. या संस्थेने इमारतीच्या छतावरील पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे कंत्राट एका कंपनीला दिले होते. या कंपनीमध्ये विवेक कुमार, योगेश नरवनकर, गणेश नरवनकर आणि मिथुन ओझा हे काम करतात. आज (रविवार) दुपारी हे चौघेजण पाण्याच्या टाकीत उतरले होते. टाकी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी आतमध्ये एक रासायनिक द्रव्य सोडले होते. या रासायनिक द्रव्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.

घटनेची माहिती संस्थेच्या सभासदांनी नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने चारही कामगारांना बाहेर काढले. परंतु यातील विवेक आणि योगेश या दोघांचाही मृत्यू झालेला होता. तर गणेश आणि मिथुन या दोघांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचावकार्यानंतर काही पोलिसांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रासही जाणवला, अशी माहिती संजय धुमाळ यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane two workers suffocated to death while cleaning water tank msr

ताज्या बातम्या