उल्हासनगर: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाचा कर्तव्यावर असताना अकस्मात मृत्यू झाला आहे. गाझियाबाद येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे उल्हासनगरचे सुपुत्र अनिल निकम यांचे निधन झाले.

ही घटना दिल्लीजवळील गाझियाबाद येथे घडली. अनिल निकम हे मूळचे उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक ३ भागात असलेल्या केणी चाळ, साईबाबा मंदिराच्या मागे राहणारे होते. कर्तव्यावर असताना अचानक अनिल निकम यांची तब्येत बिघडली. सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना घटनास्थळीच मृत घोषित केले.

शुक्रवार, ९ मे रोजी त्यांचा मृतदेह उल्हासनगरात आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर उल्हासनगरच्या स्मशानभुमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेच्या वेळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.