ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये पदक न मिळाल्याने ‘जेन अल्फा’ने थेट महापालिकेच्या मुख्य व्यासपीठासमोर ठिय्या आंदोलन केले. ‘मेडल, मेडल’ अशी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी पदकाची मागणी केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी यांच्यासह अन्य अधिकारी व्यासपीठावर उपस्थित असतानाच विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.

वर्षा मॅरेथॉनला रविवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून देशभरातून आलेल्या धावपटूंना शुभेच्छा दिल्या. विविध वयोगटांतील धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. शालेय विद्यार्थ्यांचाही स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर पदक न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी अचानक मुख्य व्यासपीठासमोर ठिय्या मांडला. ‘मेडल, मेडल’ अशी घोषणाबाजी करत त्यांनी पदकाची मागणी केली. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर त्यांची समजूत काढण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर विद्यार्थी तेथून निघून गेले.

या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. ‘महापौर वर्षा मॅरेथॉन’मध्ये घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करीत त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या लहान मुलांनी आपले कौशल्य दाखवत स्पर्धा पूर्ण केली. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना त्यांचे हक्काचे पदकही मिळाले नाही. स्वतःच्या हक्कासाठी या लहान मुलांना भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करावे लागणे ही ठाण्याच्या संस्कृतीला आणि क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणारी बाब आहे, अशी टीका दिघे यांनी केली.

सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन केवळ इव्हेंट आणि जाहिरातबाजीमध्ये मग्न असून प्रत्यक्ष मैदानावर खेळाडूंची थट्टा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी महापालिका प्रशासनाने स्वीकारावी. हा ढिसाळ कारभार नेमका कोणामुळे झाला, याची तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच, सर्व लहान खेळाडूंची जाहीर माफी मागून त्यांना त्यांचे पदक सन्मानाने घरपोच करण्यात यावे, अशी मागणी दिघे यांनी केली. प्रशासनाने याबाबत दिरंगाई केल्यास या भोंगळ कारभाराविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिघे यांनी दिला.