ठाणे : ठाणे महापालिका व महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेच्या माध्यमातून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ३२व्या ठाणे वर्षा मॅरेथाॅन स्पर्धेसाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. या वाहतूक बदलांमुळे ठाणे शहरात पर्यायी मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री ८ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.

ठाणे वर्षा मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून धावपटू, खेळाडू यासह बहुतांश ठाणेकर सहभागी होत असतात. यंदाही स्पर्धेत २१ किमी (पुरुष, महिला), १० किमी (पुरुष, महिला), १५ वर्षांवरील मुला-मुलींसाठी ५ किमी या प्रमुख गटांसह विविध वयोगटासाठी स्पर्धा असेल. स्पर्धेच्या मार्गिकेवर वाहनांची गर्दी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.

या वाहतूक बदलानुसार, नितीन कंपनी येथून ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर नितीन कंपनी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन हात नाका, हरिनिवास मार्गे वाहतूक करतील. अल्मेडा सिग्नल येथून ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना अल्मेडा सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वंदना एसटी आगार, खोपट मार्गे वाहतूक करतील.

ज्ञानेश्वर नगर व आंबेवाडी, कामगार नगर नाका येथून यशोधन नगरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना कामगार नगर नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने इंदिरा नगर नाका येथून वाहतूक करतील. कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनी व नितीन कंपनी ते तीन हात नाका सेवा सेवा रस्त्यावर दोन्ही दिशेला वाहने उभी करण्यास मनाई असेल. तसेच तीन हात नाका ते तीन पेट्रोल पंप, घड्याळ नाका ते हाॅटेल तंबी, मदनलाल धिंग्रा ते ठाणे महापालिका मुख्यालय चौक, अल्मेडा सिग्नल ते ठाणे महापालिका मुख्यालय चौक, दगडी शाळा ते मालतीबाई रुग्णालय येथे वाहने उभी करण्यास मनाई असेल. वागळे इस्टेट येथे माॅडेल चेकनाका ते रस्ता क्रमांक १६ आणि रस्ता क्रमांक २२ ते साठेनगर चौक येथे वाहने उभी करण्यास मनाई असेल.