ठाणे – येथील वर्तकनगर भागातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टच्या मालकीची जमीन असतानाही तिचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे प्रकरण पुढे आले होते. ट्रस्टने औपचारिक तक्रार दाखल केली होती तर, ट्रस्टच्या माध्यमातून ठाणे सिटीझन्स फाउंडेशनकडे कायदेशीर लढा दिला होता. तब्बल नऊ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढ्यानंतर एकूण २०,५७० चौरस मीटर क्षेत्रफळाची सुमारे ११६ कोटी रुपये किमतीची जमीन ट्रस्टला अखेर परत मिळाली आहे.

ठाणे येथील वर्तकनगर भागातील (माजीवडा क्षेत्र) सेक्टर क्रमांक ४ मध्ये खेळाचे मैदान आरक्षित आहे. या मैदानाच्या जागेचा सर्वे क्रमांक १८८, १८९/२ए आणि १९२/३/बी असा आहे. ही जमीन मूळतः सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टच्या मालकी आहे. असे असतानाही तिचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याची बाब ट्रस्टच्या निदर्शनास आली. यानंतर ट्रस्टने औपचारिक तक्रार दाखल केली आणि जमीन परत मिळवण्यासाठी ठाणे सिटीझन्स फाउंडेशनकडे कायदेशीर मदतीची विनंती केली होती. त्यानुसार, फाउंडेशनने कायदेशीर लढा दिला, असे ठाणे सिटीझन्स फाउंडेशनचे कॅसबेर ऑगस्टीन यांनी सांगितले.

२०१७ मध्ये हिरानंदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सर्वे क्रमांकातील तफावत दूर न करता, अनिवार्य टीआयएलआर (TILR) सर्वेक्षण न करता तसेच खेळाच्या मैदानाच्या अंतिम सीमांकनाची खात्री न करता संपूर्ण २०,५७० चौ.मी. जमीन ठाणे महापालिकेच्या नावावर हस्तांतरित केली. ही प्रक्रिया जमीन आणि महसूल कायद्यांचे उल्लंघन करणारी होती. सुरुवातीला २०,५७० चौ.मी. जमिनीचा दावा करणाऱ्या महापालिकेने नंतर आपला दावा कमी करून केवळ १०,१३०.४९ चौ.मी. असल्याचे सांगितले. यामुळे व्यवहारातील गंभीर विसंगती आणि प्रक्रियात्मक त्रुटी समोर आल्या होत्या.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, महापालिकेच्या नावावर बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या २०,५७० चौ.मी. जमिनीपैकी सुमारे ९०० चौ.मी. जमीन हिरानंदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आदित्य बिल्डर्स यांना विकली. ही ९०० चौ. मी. जमीन सर्वे नंबर १८९ मधील असून ती ट्रस्टच्या निवासी क्षेत्रात येत होती, जी कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरित करता येण्याजोगी नव्हती. ही विक्री पूर्णपणे बेकायदेशीर, अनधिकृत आणि फसवणूकपूर्ण असून जमीन, नगररचना आणि महसूल कायद्यांचे उघड उल्लंघन आहे, असे ऑगस्टीन यांनी सांगितले.

सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टच्या विश्वस्तांनी २००६ मध्ये दीपक डायस यांना पॉवर ऑफ ऑथॉरिटी दिली होती, त्यांनी आपल्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर आणि अतिक्रमण केले, विश्वस्तांना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फसवले, आणि हिरानंदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. सोबत संगनमत करून ट्रस्टच्या विकास हक्कांची बेकायदेशीर विक्री केली. या बेकायदेशीर व्यवहारासाठी त्यांनी सुमारे ७५ लाखांची लाच स्वीकारली. या प्रकरणामुळे विश्वस्तांवर चुकीचे आरोप झाले आणि त्यांची प्रतिमा मलिन झाली, असा आरोप त्यांनी केला.

या सर्व बेकायदेशीर कृत्यांचा परिणाम लिटिल फ्लॉवर हायस्कूल तसेच आवर लेडी ऑफ मर्सी चर्चच्या पॅरिशनर्सवर झाला. मुलांच्या शिक्षण, खेळ, सुरक्षितता आणि खुल्या जागांवर याचे दीर्घकालीन सामाजिक परिणाम दिसून आले. ठाणे सिटीझन्स फाउंडेशनने हा विषय उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग यांच्यासमोर सातत्याने मांडला. अखेरीस अपर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णायक आदेश देत संपूर्ण हस्तांतरण रद्द केले आणि जमीन ट्रस्टकडे परत देण्याचे निर्देश दिले, अशी माहिती त्यांनी दिली.