ठाणे – ठाणे शहरातील पदपथांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे आधीच पदपथ नागरिकांसाठी अरुंद झाले असताना आता पदपथांखालील गटारांची झाकणे गायब, तुटलेली किंवा धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. पाऊस सुरू झाल्यास ही स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार पदपथावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक पदपथ अद्यापही फेरीवाल्यांच्या विळख्यात आहेत. त्यातच उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे पदपथ मृत्यूचे सापळे ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मागीलवर्षी मनोरुग्णालय परिसरात आईसोबत चालत असलेला दोन वर्षांचा मुलगा उघड्या चेंबरमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. असे असताना शहरातील पदपथांवरील सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. वसंत विहार, कळवा, विटावा, मुंब्रा, दिवा यांसह अनेक परिसरात पदपथांखालील गटारांची झाकणे तुटलेली किंवा गायब असल्याचे आढळून येत आहे.
वसंत विहार हा ठाण्यातील प्रमुख निवासी आणि व्यापारी परिसर मानला जातो. पाऊस अजून सुरू झालेला नसतानाही येथील पदपथांची अवस्था चिंताजनक आहे. सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक या पदपथांचा वापर करतात. मात्र अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली, खचलेली किंवा खराब अवस्थेत असल्याने पादचाऱ्यांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. सध्या अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची स्थिती असतानाच दुरुस्ती न झाल्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण, झाडांच्या फांद्या आणि पार्क केलेली वाहने यामुळे पदपथांवरील धोकादायक भाग दिसूनही येत नाही. दिवा, मुंब्रा आणि विटावा परिसरातही अशीच अवस्था असून अनेक ठिकाणी झाकणे गायब किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने तपासणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
