ठाणे-वाशी ‘त्रास’हार्बर!

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळेत झालेल्या या बिघाडाचा नोकरदार वर्गाला प्रचंड मोठा फटका बसला.

ट्रान्स हार्बर वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांनी बससेवेचा आधार घेतला. (छायाचित्र : गणेश जाधव)

ट्रान्सहार्बर लोकलवाहतूक सलग दुसऱ्या दिवशी कोलमडली

रबाळे-घणसोली स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने सोमवारी सकाळी ठाणे-वाशी मार्गावरील ट्रान्सहार्बर लोकल वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी कोलमडली. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळेत झालेल्या या बिघाडाचा नोकरदार वर्गाला प्रचंड मोठा फटका बसला. ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांना कुर्लामार्गे जाणाऱ्या लोकलसाठी धावावे लागले. तर, रेल्वेसेवा बंद पडल्याने या दोन शहरांतील बससेवांनाही प्रचंड गर्दी उसळली. दुसरीकडे, प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेत रिक्षाचालकांनीही नेहमीप्रमाणे मनमानी भाडे आकारत लुटीचा धंदा आरंभला.
रबाळे आणि घणसोलीदरम्यान ओव्हरहेड वायर सोमवारी सकाळी तुटल्याने लोकलसेवा खंडित झाली. दुरुस्तीचे हे काम सुमारे चार-पाच तास सुरू होते. यादरम्यान प्रवाशांना कुर्लामार्गे प्रवासाची मुभा देण्यात आली. परंतु, बहुतांश प्रवाशांनी बससेवेकडे धाव घेतली. त्यामुळे ठाणे तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा दुपापर्यंत भरून वाहत होत्या. दुसरीकडे, रिक्षाचालकांनीही मनमानी भाडे आकारणी करत प्रवाशांची लूट केली.
रविवारीही खोळंबा..
रविवारीदेखील ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली येथे सकाळी पावणे आकराच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ऐरोली, घणसोली, तुर्भे आदी स्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रविवारी ऐरोलीजवळ तुटलेल्या ओव्हरहेड वायरमुळे तब्बल तीन तास हा मार्ग बंद होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane vashi train problem today