ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते मतदारांपर्यंत पोहण्यासाठी कामाला लागले आहेत. असे असतानाच, शिंदेच्या शिवसेनेने वट पौर्णिमेचे निमित्त साधत नौपाड्यात वटवृक्षाच्या कट्ट्याला पक्षाचा बॅनर बांधून प्रचार केला. त्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नागरिकांनी संताप व्यक्त करत ‘सणांमध्ये राजकारण करू नका’ असे मत व्यक्त केले.
वटवृक्ष हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. वटपौर्णिमा या सणाच्या दिवशी महिला वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. वृक्षाभोवती फेऱ्या मारून पूजा केली जाते. यामुळे वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाजवळ महिलांची पुजेसाठी मोठी गर्दी होते. हीच बाब लक्षात घेऊन शिंदेच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ठाण्यात आगळा-वेगळा पक्षाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. शहरातील नौपाडा भागात असलेल्या बी केबीन परिसरात वडाचे मोठे वृक्ष आहे. येथे परिसरातील अनेक महिला वटपौर्णिमा या सणाच्या दिवशी पूजा करण्यासाठी येत असतात. यंदाही म्हणजेच मंगळवारी सुद्धा हेच चित्र कायम होते. या वृक्षाच्या कट्ट्याभोवती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाचा बॅनर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लावला होता. ‘शिवसेना प्रभाग क्रमांक २१’ आणि त्यावर धनुष्यबाणाचे चिन्ह या बॅनरवर होते. हि बॅनरबाजी पुजेसाठी आलेल्या महिलांचे लक्ष वेधून घेत होती.
सणांमध्ये राजकारण आणले जात असल्याच्या मुद्द्यावरून या बॅनरबाजीविषयी महिलांसह स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. काही नागरिकांनी या बॅनरबाजीस विरोधही दर्शविला. सणांमध्ये राजकारण करू नका असे मत संगम डोंगरे यांनी व्यक्त केले. तसेच महिलांनी पूजा करताना वडाच्या वृक्षासोबतच पक्षाच्या बॅनरला सुद्धा फेऱ्या मारायच्या का? असा उपरोधित टिकाही त्यांनी केली. तसेच या ठिकाणी पूजेसाठी आलेली महिला इतर पक्षाची असेल तर त्यांनी या वृक्षाची पूजा करायची की नाही असा प्रश्न देखील काही महिलांनी उपस्थित केला.