ठाणे : शहरातील पोखरण रस्ता क्रमांक २ येथील द क्रेव्ह ट्रक येथे दुर्मीळ गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हेरिटेज व्हेहिकल ओनर्स क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९३७ पासून २०११ पर्यंतच्या दुर्मिळ दुचाकी आणि चार चाकी वाहने नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली.

नेहमीच चित्रपटांमध्ये किंवा जुन्या छायाचित्रांमध्ये दिसणारी दुर्मिळ वाहने पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली. यासाठी ठाणेकरांनी विशेष म्हणजे तरुण पिढीने रविवारी सकाळ पासून प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी केली होती.

या प्रदर्शनात सुमारे ५५ हून अधिक दुर्मीळ दुचाकी तर, ३०-३५ चार चाकी वाहने होती. त्यामध्ये नॅनोपेक्षाही आकाराने लहान असलेल्या फियाट ११०० या गाडीपासून ते आकाराने मोठ्या असणाऱ्या नैश यासारख्या विविध गाड्यांचा समावेश होता.

मर्सिडीज, मारुती, फियाट, हिंदुस्तान अशा विविध कंपन्यांच्या जुन्या दुर्मिळ कारचे विविध मॉडेल प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर रॉयल एनफिल्ड, होण्डा या कंपनीच्या जुन्या दुचाकीचे मॉडेल देखील प्रदर्शनात होते. हेरिटेज व्हेहिकल ओनर्स क्लब ऑफ ठाणे चे सदस्य याठिकाणी वाहनांची माहिती उपस्थितांना देत होते. सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३.३० पर्यंत जवळपास १ हजाराहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. या दुर्मिळ वाहनांसोबत छायाचित्र काढण्यास मग्न होते, अशी माहिती हेरिटेज व्हेहिकल ओनर्स क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने देण्यात आली.