ठाणे : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेअंतर्गत (एसआयआर) ठाणे जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदारयादीत ज्या नागरिकांचे नाव समाविष्ट नाही, त्यांना नावाचा समावेश, तसेच नाव वा घरच्या पत्त्यातील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. त्यासाठी लगतच्या मतदानकेंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१८ विधानसभा मतदारसंघांत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीनुसार एकूण ४५ लाख ९१ हजार १३८ मतदारांची नोंद झाली. यात २३ लाख ५० हजार ७९५ पुरुष, २२ लाख ३९ हजार ६४९ महिला व ६९४ इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ६,८३१ मतदान केंद्रांवर मतदारयादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात व पदनिर्देशित ठिकाणीही मतदारयादीची पाहणी करता येईल. विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदारयादीबाबत दावे व हरकती दाखल करता येतील.
मतदारयादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७, तर नाव वा पत्त्यात दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ आवश्यक कागदपत्रे व घोषणापत्रासह सादर करावा लागेल.
दरम्यान, प्राप्त दावे व हरकतींवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत सुनावणी घेऊन त्यांचे निवारण करण्यात येईल. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्राप्त दावे व हरकतींची अद्ययावत माहिती संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत दर आठवड्याला मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिली जाईल.
नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी या प्रक्रियेत द्विस्तरीय अपील यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत समाधान नसल्यास संबंधितांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे प्रथम अपील करता येईल. त्यांच्या निर्णयाबाबतही समाधान न झाल्यास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दुसरे अपील दाखल करण्याची कायदेशीर तरतूद आहे.
नागरिकांनी प्रारूप मतदारयादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत. पात्र नागरिकांनी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची तसेच आवश्यक दुरुस्तीची ही संधी गमावू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
२८ लाख नावे वगळली
– जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीत (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाली असून, या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांच्या नोंदींची छाननी करण्यात आली होती.
– जिल्ह्यातील ६,८९४ मतदार यादी भागांत ६,८९४ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून घरभेटी घेत मतदारांच्या नोंदींची पडताळणी केली.
– या संपूर्ण प्रक्रियेनंतर तब्बल २८ लाख ६० हजार ३०३ नोंदी मृत, गैरहजर, स्थलांतरित, दुबार व इतर अशा वर्गवारीत आल्या असून या मतदारांची नावे प्रारूपात यादीतून वगळली आहेत.
