ठाणे – निवडणुक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल २४ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, माझ्या पत्नीचे तसेच ठाण्याचे निवासी नायब तहसीलदार असलेल्या दिनेश पैठणकर यांच्या ८० वर्षीय मातोश्रीचे नाव वगळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नावे पूर्ववत केली नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन एसआयआर मोहीमेतील त्रुटीबाबत गंभीर आरोप केले. ही मोहिम पारदर्शकपणे न राबवता अनेक ठिकाणी बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी न जाता घरबसल्या सर्वेक्षण केल्याचा दावा चव्हाण यांनी केला.ओवळा-माजिवडा मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी एसआयआर मोहिम ८० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात ही मोहीम ८० टक्के फ्लॉप ठरल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
ठाण्याचे निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या ८० वर्षीय मातोश्री वत्सला बाबुलाल पैठणकर यांनी अर्ज भरूनही त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आले. विशेष म्हणजे, माझी पत्नी अरुणा विक्रांत चव्हाण हिचेही अनेक दशकांपासून मतदार यादीत असलेले नाव एसआयआर प्रक्रियेनंतर वगळण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. वगळण्यात आलेली सर्व नावे तातडीने पूर्ववत करावीत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच एसआयआर मोहीम पुन्हा राबवावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
