ठाणे : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करा. पात्र मतदाराचे नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही आणि अपात्र नोंद मतदार यादीत कायम राहणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्या. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) कामाचे नियमित परीक्षण करून निर्धारित कालमर्यादेत पुनरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे सक्त निर्देश अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेला दिले.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआयआरच्या कामाची तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. मतदार यादीची अचूकता हा या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून, त्यासाठी प्रत्येक स्तरावर काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
एसआयआर प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करत चोक्कलिंगम यांनी त्यांच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. बीएलओंनी घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती प्रत्यक्ष पडताळावी, गणना फॉर्म काळजीपूर्वक व अचूक भरावेत आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी. प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबरोबरच मतदार नोंदणीस पात्र असलेली कोणतीही व्यक्ती प्रक्रियेबाहेर राहणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष सखोल पुनरीक्षण हा केवळ प्रशासकीय कार्यक्रम नसून मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे. मतदार यादीतील अपात्र नोंदी नियमानुसार आणि निर्धारित वेळेत वगळाव्यात, तर पात्र मतदारांची नावे अचूकपणे समाविष्ट करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर त्रुटी राहू नयेत, यासाठी निवडणूक यंत्रणेतील सर्व घटकांनी प्रभावी समन्वय राखावा, असेही त्यांनी बजावले.
बैठकीत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय एसआयआरच्या कामाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक मतदारसंघातील बीएलओंचे काम, मतदार पडताळणीची सद्यस्थिती, अर्जांची छाननी आणि प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक शाखा आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयातून निर्धारित वेळापत्रकानुसार उद्दिष्टे पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी काम प्रलंबित आहे, तेथे त्याचा तातडीने निपटारा करून प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले.
या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्यासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.फ
