ठाणे : विशेष सखोल फेरबदल (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या दावे व हरकतींसाठीची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनाही या कालावधीत नाव नोंदणी, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती अथवा नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्देशांनुसार एसआयआर कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत देण्यात आली असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी सर्वेक्षण कार्यक्रम न झाल्याने १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनेक नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता आले नव्हते. आता १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना या विशेष मोहिमेत नाव नोंदविता येणार आहे. तसेच गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांनाही त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून नोंदणीची संधी देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दावे व हरकती स्वीकारण्यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदनिर्देशित ठिकाणी तसेच मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही शिबिरे होणार आहेत. नागरिकांना या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीसाठी नमुना ६, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना ८ आणि नाव वगळण्यासाठी नमुना ७ सादर करता येणार आहे.

संबंधित अर्जासोबत आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या विशेष शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासह संबंधित राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) उपस्थित राहणार आहेत. महिला आणि दिव्यांग नागरिकांच्या मतदार यादीतील समावेशनाला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव तपासून, नाव नसल्यास आवश्यक अर्ज व कागदपत्रांसह या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.