ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जादूटोण्याचा प्रकार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३ चे कलम २९९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
वागळे इस्टेट येथील संत ज्ञानेश्वर नगर भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक असून चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला चबूतरा बांधला आहे. ३ मे या दिवशी परिसरात राहणारी एक महिला तेथून जात असताना त्यांना चबूतऱ्याच्या मागील बाजूस प्लास्टिकची पिशवी उघड्या स्थितीत दिसली. त्यांनी पिशवीत पाहिले असता, त्यामध्ये नारळ, सुपारी, खाऊची पाने, छोट्या डबीमध्ये पिवळ्या रंगाचे द्रव पदार्थ, सिगारेट पाकिटात सिगारेट आणि वस्तूंची यादी आढळून आली. या घटनेनंतर महिलेने याबाबतची माहिती त्यांच्या समजातील इतर नागरिकांना दिली.
हा प्रकार सामाजिक तेढ निर्माण करणारा आणि जादूटोण्याचा असल्याने त्यांनी तात्काळ वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३ चे कलम २९९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
