ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील किसननगर परिसरात ४० ते ५० वर्ष जुन्या तळ अधिक दोन मजली इमारतीच्या सज्जाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर सुरक्षितेच्या दृष्टीने इमारत तात्पुरत्या स्वरुपात पूर्णतः रिकामी करण्यात आली असून, इमारतीमधील रहिवाशांची राहण्याची सोय त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे केली आहे.
किसननगर क्रमांक तीन येथे सुयोग निवास अपार्टमेंट ही तळ अधिक दोनमजली इमारत आहे. ही इमारत सुमारे ४० ते ५० वर्ष जुनी आहे. शनिवारी रात्री १०.४४ वाजताच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सज्जाचा भाग कोसळला. तसेच उर्वरित भाग देखील धोकादायक स्थितीत झाला होता.
घटनेची माहिती नगरसेवक योगेश जानकर यांनी ठाणे महापालिकेला दिल्यानंतर महापालिकेचे वागळे इस्टेट प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त गणेश चौधरी, अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी जयदीप कदम, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, श्रीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इमारत ही सी २ बी (मध्यम स्वरूपाची धोकादायक) या प्रवर्गामध्ये येत आहे.
इमारतीमध्ये एकूण पाच सदनिका असून, अंदाजे २० ते २५ रहिवासी राहत होते. सुरक्षितेच्या दृष्टीने सदरची इमारत तात्पुरत्या स्वरुपात पूर्णतः रिकामी करण्यात आली असून, इमारतीमधील रहिवाशांची राहण्याची सुविधा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे केली आहे.
पहिल्या मजल्यावरील धोकादायक सज्जाचा काही भाग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी काढून बाजूला केला आहे. पुढील कार्यवाही वागळे प्रभाग समिती, बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात येणार आहे.
