ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी गेल्या १५ दिवसांत शहरात तीन खून झाल्याचा दावा करीत ‘ठाण्याचा वासेपूर होतोय का’, असा सवाल केला. तसेच ‘ठाण्यातला रामाधीश कोण’, असा सवाल उपस्थित करून त्यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची कार्यालयात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हत्या, पोलिस ठाण्यात झालेली हाणामारी, कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची हत्या अशा घटनांमुळे ठाण्यात सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे. शांत, सुसंस्कृत आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या या गंभीर गुन्ह्यांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी काही प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रदीप पूर्णेकर हे गेल्या २५ वर्षांपासून आपले मित्र होते. ते उबाठाचे काम उत्कृष्टपणे करीत होते. त्यांच्या पत्नीनेही महापालिका निवडणुकीत चांगली लढत दिली होती. त्यांच्या हत्येचा आम्ही निषेध करीत आहोत, असे प्रधान यांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांत ठाण्यात तीन खून झाले आहेत. एका पीएसआयचाही खून झाला आहे. एका पोलीस ठाण्यात घुसून महिला मारझोड करीत आहेत. म्हणूनच आपल्या ठाणे शहराचे नाव वासेपूर करू या का, असा प्रश्न आता माझ्या डोक्यात आहे. आणि जर वासेपूर हे नाव द्यायचे असेल, तर आपल्या शहरातला रामाधीश कोण, हा प्रश्नही आपल्यासमोर आहे, असे मनोज प्रधान यांनी म्हटले.

‘राजकीय दबाव आल्यास रस्त्यावर उतरू’

पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, अशी मागणी प्रधान यांनी केली. या प्रकरणात राजकीय दबाव आणला गेला आणि मुख्य आरोपीला अटक झाली नाही, तर रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला. इंडिया आघाडीतील एका घटक पक्षाच्या नेत्याचा खून झाला आहे. त्यामुळे या हत्याकांडात कुठेही राजकीय दबाव आला आणि मुख्य आरोपीला अटक होत नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवतो, असे प्रधान यांनी सांगितले.